नियोजनबद्ध भाजीपाला बाजारामुळे नागरिक, शेतकरी समाधानी

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १८ : कोपरगाव शहरातील दर रविवारी भरणारा भाजीपाला बाजार आता अधिक शिस्तबद्ध, सुरक्षित व नियोजनबद्ध स्वरूपात भरवण्यात येत असून याबाबत कोपरगाव नगरपरिषदेने घेतलेला निर्णय सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक ठरत आहे. तहसील मैदान येथे हा भाजीपाला बाजार अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने भरवण्यात आला असून, यासाठी कोपरगाव नगरपरिषद नगराध्यक्ष पराग संधान, उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर तसेच सर्व नगरसेवक यांच्या उपस्थितीत सखोल आखणी करण्यात आली होती.

यापूर्वी शहरातील मुख्य रस्त्यांवर भाजीपाला बाजार भरत असल्याने वाहतुकीस मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होत होता. वाहनचालक, पादचारी, रुग्णवाहिका तसेच शालेय वाहनांना याचा त्रास सहन करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन नगरपरिषदेने शेतकरी, भाजीपाला विक्रेते यांच्याशी सविस्तर चर्चा केली. सर्व घटकांचे मत विचारात घेऊन एकमताने निर्णय घेत रस्त्यावर बाजार न भरवता तो तहसील मैदानातील आखीव व निश्चित जागेत भरवण्याचे चोख नियोजन करण्यात आले.

या नव्या व्यवस्थेमुळे वाहतुकीचा प्रश्न सुटला असून शहरातील रहदारी सुरळीत झाली आहे. भाजीपाला विक्रेत्यांनाही स्वतंत्र, मोकळी व सुरक्षित जागा उपलब्ध झाल्याने ते समाधान व्यक्त करत आहेत. ग्राहकांनाही स्वच्छ, प्रशस्त आणि एकाच ठिकाणी सर्व भाजीपाला उपलब्ध होत असल्याने खरेदी करणे अधिक सोयीचे झाले आहे.

नगराध्यक्ष पराग संधान व उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर व नगरसेवकांनी स्वतः उपस्थित राहून बाजाराची पाहणी केली तसेच व्यवस्थेवर लक्ष ठेवले. नगरपरिषदेच्या या लोकाभिमुख निर्णयामुळे शहरातील शिस्त, सुरक्षितता आणि सुव्यवस्था यांना चालना मिळाली असून सर्व स्तरांतून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. कोपरगाव नगरपरिषद भविष्यातही अशाच नियोजनबद्ध आणि जनहिताच्या निर्णयांसाठी कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

Leave a Reply