कोपरगाव प्रतिनिधी, दि. २३ : कोपरगाव शहरातील एका सरकारी सेवानिवृत्त दांपत्यांना ऑनलाईन अर्थात डिजिटल गुन्हा दाखल झाल्याचे सांगून व धमकावून तब्बल ८७ लाख ३० हजार ४०० रूपयांना गंडा घातल्याने सेवानिवृत्तीमध्ये पतीपत्नी जमा केलेल्या पैशावर गुजरण करण्या ऐवजी काही क्षणात गंडा घातल्याने होत्याचे नव्हते होवून आज म्हातारपणी पैशाअभावी रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. अशी फसवणूक कोपरगावसाठी नवीन नाही या पुर्वीही येथील एका नामवंत डॉक्टर दांपत्यांना ६ लाखाला गंडा अशाच पध्दतीने घालण्यात आला, एका वकीलाच्या भावालाही गंडा घालत असताना वकीलाच्या चाणक्षपणामुळे थोडक्यात वाचले.

दरम्यान ८७ लाखाची फसवणूक झाल्या संदर्भात पोलीसांकडून मिळालेली माहीती अशी की, शहरातील विवेकानंद नगर येथील रहिवासी असलेले नंदकिशोर मोहनलाल लोंगाणी हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातून सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्याकडे सेवानिवृत्तीतून मिळालेले पैसे बॅंकेत होते ते आपली पत्नी विनाकुमारीसह कोपरगामध्ये राहतात. त्यांचा मुलगा पुण्यामध्ये नोकरीला आहे. सुखामध्ये चाललेल्या जीवनात १२ जानेवारी रोजी अचानक दुःखी जीवनाचा दुर्दैवी काॅल मोबाईवर आला.

नंदकिशोर लोंगाणी हे सभ्य स्वभावाचे असल्याने त्यांनी तो काॅल उचला तर समोरुन संबंधित व्यक्ती हिंदीमधून बोलला की, मी सायबर क्राईमधून बोलतोय तुमच्या मोबाईल नंबर वरुन घाणेरडे फोटो व मॅसेज २० लोकांना पाठविले आहेत त्यामुळे तुमच्या विरोधात तक्रार दाखल झाली आहे.

तसेच तुमचा आधारकार्डचा वापर करुन मोबाईल नंबर रजिस्टर झाला आहे. सोबतच तुमच्या नावाने इस्लामी नामक एका कुविख्यात कंपनीशी निगडीत जमिन खरेदी विक्रीचा २ कोटीचा व्यवहार झाला असुन त्या व्यवहारातील २० लाख रुपये तुमच्या बॅंक खात्यात जमा झाले आहेत. तुमच्या नावाचे एटीएम कार्ड असुन त्या द्वारे व्यवहार झाला आहे तसा गुन्हा साबर क्राईममध्ये दाखल आहे म्हणत सुप्रिम कोर्टाच्या नावाने लोंगाणीच्या विरोधात तक्रार असल्याचा मजकूर व्हाट्सअप वर पाठवण्यात आला.

वयोवृद्ध लोंगाणी दांपत्य घाबरुन गेले. संबधीत व्यक्तीने त्यांना व्हाट्सअप काॅल करुन विविध प्रकारे भिती दाखवत या केस मधुन कसे बाहेर पडायचे हेही सांगत त्यांचा विश्वास संपादन केला व्हिडिओ काॅल करुन पोलीस अधिकारी असल्याचे व पोलीस स्टेशनमध्ये बसल्याचे खाकी वर्दीतील व्हिडिओ करुन लोंगाणी यांना खाञी पटवली त्यानंतर लोंगाणी यांना सांगितले की, या प्रकरणातुन बाहेर पडण्यासाठी विविध प्रकारची पध्दत वापरावी लागेल त्यासाठी तुमचे आधारकार्ड तपासणी करावी लागते म्हणत दोघांचे आधारकार्डचे फोटो व्हाट्सअप वर मागविले, त्यांचे सध्याचे बॅंक खाते व त्याचे डिटेल्स घेतले त्यानंतर त्याच्याकडील बॅंकखाते सांगितले व झालेल्या गुन्ह्यातून बाहेर निघण्यासाठी तुमच्या खात्यावरील सर्व रक्कम मी दिलेल्या खात्यावर पाठवण्यासाठी सांगितले.

पाठवलेले पैसे कोर्टात तपासणी झाल्यानंतर तुम्हाला परत मिळणार असल्याचा विश्वास दिल्यामुळे या झंझट मधून बाहेर निघण्याच्या आशेने लोंगाणी यांनी त्याच्या खात्यातील ३४ लाख २० हजार २०० रूपये आरटीजीएस केले. त्यानंतर त्यांना कोर्टाच्या नावाने जमा झालेली पावती देण्यात आली पुन्हा लोंगाणी यांच्या पत्नीच्या नावे असलेले बॅंकेतील ५३ लाख १० हजार २०० रुपये टाकण्यास भाग पाडले.

त्यानंतर दोन दिवस सतत रिपोर्टींग करण्याच्या सुचना देत राहीले शिवाय हि बाब कोणाला सांगायची नाही असे वारंवार सांगत असल्याने लोंगाणी यांना संशय आला व त्यांनी इंटरनेटवर डिजिटल अरेस्ट असे सर्च केल्यानंतर त्यांना हे सर्व फसवाफसवी असल्याचे समजले तोपर्यंत त्यांच्या जवळचे सर्व पैसे लुटले असुन आपली फसवणूक झाल्याची तक्रार साबयर क्राईम व कोपरगाव शहर पोलीसात देण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस व सायबर करीत आहेत.


