थकीत मालमत्ता करावरील 100% शास्ती माफी करून दिलासा द्यावा – विवेक कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २८ : कोपरगाव नगरपरिषद क्षेत्रातील नागरिकांवर थकीत मालमत्ता करामुळे लादण्यात आलेली शास्ती माफ करण्यात यावी, तसेच शासनाच्या प्रोत्साहनात्मक अभय योजनेला तातडीने मंजुरी द्यावी. यासाठी कोपरगाव नगरपरिषद व जिल्हा स्तरावरून शासनाकडे आलेल्या प्रस्तावाला गती द्यावी व कोपरगावकरासाठी तातडीने निर्णय व्हावा व शास्तीची रक्कम शंभर टक्के माफ करावी अशी मागणी युवानेते विवेक कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज प्रत्यक्ष भेट घेऊन केली.

राज्यातील नगरपरिषद, नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रातील थकीत मालमत्ता करावरील शास्ती माफीसाठी नगरविकास विभागाने शासन निर्णयाद्वारे अभय योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर कोपरगाव नगरपरिषद क्षेत्रातही सदर योजना तातडीने लागू करण्यात यावी, यासाठी युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सविस्तर निवेदन सादर केले.

या निवेदनात कोपरगाव नगरपरिषद क्षेत्रातील सुमारे 18628 हजारांहून अधिक मालमत्ताधारक नागरिकांवर लादण्यात आलेली रुपये 1 कोटी 83 लाख 94 हजार माफ व्हावी. या शास्तीमुळे निर्माण झालेली आर्थिक अडचण आणि सामान्य नागरिकांवरील वाढता करभार याची सविस्तर माहिती मांडण्यात आली. शासनाने ठरविलेल्या 100 टक्के शास्ती माफी देण्याचा निर्णय कोपरगाव नगरपरिषद क्षेत्रालाही तातडीने लागू करावा, अशी स्पष्ट मागणी करण्यात आली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीची दखल घेत सकारात्मक प्रतिसाद दिला असून संबंधित प्रस्तावावर कार्यवाही करण्याचे संकेत दिल्याचे युवानेते विवेक कोल्हे यांनी यावेळी सांगितले.

सदर शास्ती माफी योजना लागू झाल्यास कोपरगाव शहरातील सामान्य नागरिक, व्यापारी व मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळणार असून नगरपरिषदेच्या उत्पन्नातही लक्षणीय वाढ होणार आहे. जनहिताचा विचार करून शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा युवानेते विवेक कोल्हे यांनी व्यक्त केली.

Leave a Reply