कोपरगाव प्रतिनिधी, दि. ६/८/२०२६ : यश हे परिस्थितीवर नसून ईच्छा व मेहनतीच्या बळावर मिळवता येते अशी प्रतिक्रिया नुकत्याच कालवा निरीक्षकपदी निवड झालेले शिवप्रसाद पंडोरे यांनी एका सत्कार प्रसंगी सांगितले . शिवप्रसाद पंडोरे यांची घरची परिस्थिती ही फार हलाकीची असताना त्यांचे वडील भैय्यासाहेब गारिगार विकून भंगार गोळा करून तर आई भारती ह्या शेतात मोलमजुरी करून उदरनिर्वाह चालवत होते.

शिवप्रसाद याचे शिक्षण ४ थी पर्यंत जिल्हापरिषद प्राथमिक शाळेत झाले तर माध्यमिक शाळेत शिकण्यासाठी फी भरण्याची परिस्थिती नसल्याने त्याने दहावीपर्यंत शिक्षण नगरपालिकेच्या शाळेत पूर्ण केले. दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याने त्याचे पुढील डिप्लोमा व डिग्री हे शिक्षण शिष्यवृत्ती मिळाल्याने ते सहज पूर्ण करता आले. त्यानंतर आपण अधिकारी होण्याचे स्वप्न मनाशी बाळगून प्रचंड मेहनत घेतली आणि नुकत्याच संपन्न झालेल्या परीक्षेत यश मिळवून कालवा निरीक्षक पदी निवड झाली.

माझ्या या श्रेयाचे शिल्पकार आई-वडील, बहीण आणि मामा हे असून त्यांनी दिलेले प्रोत्साहन मला या शिखरापर्यंत नेले असे मनोगत नूतन कालवा निरीक्षक शिवप्रसाद भारती भैय्यासाहेब पंडोरे यांनी व्यक्त केले. त्याच्या निवडीबद्दल संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने अध्यक्ष बिपिन कोल्हे ,आत्मा मालिक करियर अकॅडमीच्या वतीने शेखर माळी , कोपरगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने संघाचे अध्यक्ष युसुफ रंगरेज, साहित्यिक परिषदेच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिक अविनाश पाटील ,सामाजिक कार्यकर्ते राम होडे, कदिर पठाण ,भाजी विक्रेता संघ व कहार समाजाच्या वतीने समाज बांधवांनी सत्कार करून गौरविण्यात आले.


