कोपरगाव प्रतिनिधी, दि. १९ : कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील एसटी प्रवाशांना सुरक्षित, सुविधायुक्त आणि आरामदायी प्रवासाची प्रतीक्षा करण्याची सोय उपलब्ध व्हावी, यासाठी विविध गावांमध्ये आधुनिक एसटी मार्गनिवारे (बस शेल्टर) उभारण्याकरिता ३ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.

या निर्णयामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांची मोठी गैरसोय दूर होणार असून, विशेषतः महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि नोकरदार वर्गाला दिलासा मिळणार आहे. याबद्दल आमदार विवेक कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि परविवाहन विभाग व महायुती शासनाचे आभार मानले आहेत.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अहिल्यानगर विभागांतर्गत विविध ठिकाणी प्रवासी मार्गनिवारे बांधण्यासाठी शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. या मंजुरीनुसार कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव, कुंभारी, माहेगाव देशमुख, धामोरी फाटा, जवळके, मढी बुद्रुक, तळेगाव मळे, तळेगाव, हंडेवाडी फाटा, कान्हेगाव फाटा, झगडे फाटा, वाकडी, धनगरवाडी, चितळी आणि शिंगवे या ठिकाणी एसटी प्रवाशांसाठी मार्गनिवारे उभारण्यात येणार आहेत.

ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये एसटीची प्रतीक्षा करताना प्रवाशांना ऊन, वारा आणि पावसाचा सामना करावा लागतो. विशेषतः शाळा-महाविद्यालयांत जाणारे विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. ही समस्या लक्षात घेऊन प्रवाशांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमदार विवेक कोल्हे यांनी सातत्याने पाठपुरावा केला.

या मार्गनिवार्यांमुळे ग्रामीण भागातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला अधिक सुविधायुक्त स्वरूप प्राप्त होणार आहे. गावोगावी पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या विकासाभिमुख भूमिकेतून हा महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे. ग्रामीण भागातील जनतेच्या मूलभूत सुविधांना प्राधान्य देत विकासकामांना निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती शासनाचे मनःपूर्वक आभार, अशी भावना आमदार विवेक कोल्हे यांनी व्यक्त केली.


