कोपरगाव प्रतिनिधी, दि. १९ : कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील प्रवाशांना दिलासा देण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी परिवहन विभागाकडे सादर केलेल्या प्रस्तावाची दखल घेत राज्य शासनाने १५ गावांमध्ये प्रवासी मार्ग निवारे उभारण्यासाठी तब्बल ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रवासी निवाऱ्यांअभावी ऊन, वारा आणि पावसाचा सामना करणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय दूर होणार असून ग्रामीण भागातील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

या ०३ कोटी निधीतून झगडे फाटा, सुरेगाव, कुंभारी, माहेगाव देशमुख, धामोरी फाटा, जवळके, मढी बु., तळेगाव मळे, हंडेवाडी फाटा, कान्हेगाव फाटा तसेच मतदार संघातील राहाता तालुक्यातील वाकडी, धनगरवाडी, चितळी, शिंगवे व जळगाव या १५ ठिकाणी प्रवासी मार्ग निवारे उभारण्यात येणार आहेत.

विशेषतः एसटी बसने प्रवास करणाऱ्या महिला, वयोवृद्ध नागरिक, विद्यार्थी आणि सर्वसामान्य प्रवाशांना बसची प्रतीक्षा करताना सुरक्षित व निवाऱ्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एसटी बस हे प्रवासाचे महत्त्वाचे साधन आहे. मात्र, अनेक गावांमध्ये बसची वाट पाहण्यासाठी योग्य निवाऱ्याची व्यवस्था नसल्यामुळे प्रवाशांना उन्हाळ्यात कडक ऊन, पावसाळ्यात पाऊस आणि हिवाळ्यात थंडीचा सामना करावा लागत होता.

ही अडचण लक्षात घेऊन आमदार आशुतोष काळे यांनी परिवहन विभागाकडे प्रवासी निवारे उभारण्याचा प्रस्ताव सादर करून त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळाले असून १५ गावांतील प्रवाशांना आता हक्काचा निवारा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.या कामांसाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल आमदार आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांचे आभार मानले आहेत.

आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एसटी बस ही दळणवळणाची महत्त्वाची जीवनवाहिनी आहे. त्यामुळे प्रवाशांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. कोपरगाव आगाराकडे बसची कमी असलेली संख्या व काही बसेस जुन्या होवून कायमच नादुरुस्त होत असल्यामुळे नियमितपणे बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या अडचणी वाढल्या होत्या. त्यामुळे नवीन बस मिळाव्यात यासाठी परिवहन खात्याकडे नियमितपणे केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव बस आगाराला नवीन १० लालपरी आणि १५ जिजाऊ अशा एकूण २५ नवीन बस मिळाल्या आहेत.

कोपरगाव बस आगारात बस चार्जिंग स्टेशन व बस स्थानकालगत सुरु असलेल्या व्यापारी संकुलाचे काम अंतिम टप्यात आहे. कोपरगाव बस स्थानकाच्या आवारात नव्याने सिमेंट कॉंक्रीटिकरण करण्यासाठी निधी मिळावा यासाठी प्रस्ताव दाखल केला असून त्याबाबत देखील पाठपुरावा सुरु आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी दूर करून त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे हे माझे कर्तव्य आहे.

दररोज शाळा-महाविद्यालयांत जाणारे विद्यार्थी, कामानिमित्त प्रवास करणारे नागरिक, महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने एसटीने प्रवास करतात. मात्र, बसची प्रतीक्षा करताना प्रवासी निवाऱ्यांअभावी त्यांना ऊन, वारा आणि पावसाचा सामना करावा लागतो. ही गैरसोय दूर व्हावी व सुरक्षितपणे बसची वाट पाहता यावी, यासाठी परिवहन विभागाकडे प्रस्ताव सादर करून पाठपुरावा केला होता. त्याला यश मिळून १५ गावांतील प्रवासी निवाऱ्यांसाठी ३ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या निवाऱ्यांमुळे विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांची मोठी सोय होणार आहे. यापुढेही बस प्रवाशांच्या व मतदार संघातील नागरीकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.


