नगराध्यक्ष यांच्या पाठपुराव्याला यश, १८ कामगारांच्या वारसांना मिळणार नोकरीची संधी

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २० : राज्यातील नगरपरिषदा व नगरपालिकांमध्ये लाड-पागे समितीच्या शिफारशींनुसार सफाई कामगारांच्या वारसांना वारसा हक्काने सेवेत सामावून घेण्याची तरतूद आहे. त्यानुसार कोपरगाव नगरपरिषदेच्या आस्थापनेवर यापूर्वी १९ सफाई कामगारांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, यापैकी १८ कर्मचारी सेवानिवृत्त अथवा मयत झाल्यामुळे त्यांच्या वारसांना वारसा हक्काने सेवेत सामावून घेण्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता.

या कामगारांच्या वारसांना न्याय मिळावा आणि त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावे, यासाठी संबंधित कर्मचारी व त्यांचे वारसदार गेल्या वर्षभरापासून सातत्याने प्रयत्न करीत होते. या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत नगराध्यक्ष पराग संधान यांनी शासनस्तरावर पाठपुरावा केला. शासनाने दिलेल्या निर्देशानुसार अखेर या १८ सफाई कामगारांच्या वारसांना सेवेत सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नाला मार्ग मिळाला असून संबंधित कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दरम्यान, कोपरगाव नगरपरिषदेतील आणखी २७ रोजंदारी कर्मचाऱ्यांचा सेवेत कायम करण्याचा प्रश्न गेल्या तीस वर्षांपासून प्रलंबित आहे. अनेक वर्षे सेवा करूनही या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेचा लाभ मिळालेला नाही. या कर्मचाऱ्यांची अडचण लक्षात घेऊन त्यांचाही प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन नगराध्यक्ष पराग संधान यांनी दिले आहे.

सफाई कामगार व रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे केवळ प्रशासकीय बाब म्हणून न पाहता त्यांच्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहाशी आणि भविष्याशी निगडित महत्त्वाचा विषय म्हणून पाहिले जात आहे. नगराध्यक्ष पराग संधान यांच्या पुढाकारामुळे १८ कामगारांच्या वारसांना सेवेत सामावून घेण्याचा मार्ग मोकळा झाल्याने संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. यावेळी आरोग्य सभापती वैभव आढाव, विनोद राक्षे यांच्यासह सदर विषय मार्गी लावलेले नागरिक कुटुंब उपस्थित होते.

अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे व आमदार विवेक कोल्हे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले त्यामुळे सदर विषय लवकरात लवकर पूर्णत्वास जाऊ शकला. मुख्याधिकारी अजित निकत व नगरपरिषदेचे अधिकारी यांनी प्रशासकीय पातळीवरील कामकाजाला अपेक्षित सहकार्य करून गती दिली त्यामुळे विशेष समाधान या कुटुंबांना न्याय मिळाल्याचे आहे अशी प्रतिक्रिया नगराध्यक्ष पराग संधान यांनी दिली.

Leave a Reply