कोपरगाव प्रतिनिधी, दि. १५ : शहर हद्दीत असणाऱ्या मालमत्ता धारकांना मालमत्ता सर्वेक्षण कंपनी व नगरपरिषद यांच्या हलगर्जीपणामुळे अवास्तव कर आकारणी झाली असल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. मालमत्ता धारकांना अर्ज करण्यासाठी सहाय्यता होण्यास सौ.स्नेहलता कोल्हे भाजपा संपर्क कार्यालय कोपरगाव येथे नागरिक सहाय्यता कक्ष सुरू करण्यात आला आहे.सर्व नागरिकांनी हरकत अर्ज करण्यासाठी संपर्क करावा असे आवाहन सौ.कोल्हे यांच्या कार्यालयाकडून प्रसिध्दी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
कोपरगाव नगरपरिषदेने मालमत्ता धारकांना अवास्तव घरपट्टी आकारणी करून बजावलेल्या नोटिसा विरोधात कोपरगाव भाजपाच्या वतीने सर्वप्रथम निवेदन देऊन या विषयावर सर्वांचे लक्ष वेधुन घेत नागरिकांवरील हा अवास्तव आर्थिक बोजा कमी करून मिळण्यासाठी पालिकेला निवेदन दिले होते.त्याचा परिणाम म्हणून सदर वाढीव करावर ज्यांच्या हरकती असतील त्यासाठी नागरिकांना आक्षेप नोंदवण्यास पालिकेने आवाहन केले.
मात्र या प्रक्रियेत करावा लागणारा अर्ज आणि कागदोपत्री सोपस्कार करावे लागत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. पालिकेच्या हलगर्जी कारभारामुळे नागरिकांना या समस्येतून बाहेर काढण्यासाठी भाजपा प्रदेश सचिव सौ.स्नेहलता कोल्हे व सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना अध्यक्ष युवानेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा संपर्क कार्यालय गुरुद्वारा रोड कोपरगाव येथे नागरिकांना सहाय्यता कक्ष सुरू करण्यात आला आहे. मालमत्ता धारकांनी आपल्याला प्राप्त असणारी पूर्वीची पट्टी व सध्या आलेली नवीन कर पट्टी सोबत घेऊन या कक्षात संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.