शेवगाव तालुक्यात लम्पीची ६१ जनावरांना बाधा

शेवगाव प्रतिनिधी, दि. २४ : जनावरांच्या लम्पी त्वचा रोगाचा प्रादुर्भाव शेवगाव तालुक्यात वाढला आहे.  आतापर्यंत ६१ जनावरांना त्याची बाधा झाली आहे. त्यापैकी २० जनावरे औषधोपचारानंतर बरी झाली असून सध्या ४१ जनावरांवर उपचार सुरु असल्याची माहिती पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ.चारुदत्त असलकर यांनी दिली.

         जनावरांमधील या रोगाच्या उपायोजनेसाठी तालुक्यात लसीकरणासाठी ४३ हजार डोस उपलब्ध झाले असून शुक्रवार आखेर ४० हजार ५०० जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. तालुक्यातील गायसवर्गातील सर्वच्या सर्व  ७० हजार ६८७ जनावरांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

शेवगाव व परिसरातील भटक्या जनावरांचा शोध घेवून पशुसंवर्धन विभागाने त्यांच्या लसीकरणाची मोहीम नुकतीच राबविली. सामाजिक कार्यकर्ते डॉ.नीरज लांडे पाटील, जगदीश धूत, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता फुंदे,  आदींसह गोरक्षकांनी त्यासाठी पशुसंवर्धन विभागाला त्यासाठी सहकार्य केले.

राज्य स्तरीय प्रशिक्षण केंद्राचे सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त डॉ.अरुण हरीशचंद्रे यांनी नुकतीच  तालुक्यात भातकुडगाव, भायगाव, शहरटाकळी, मजलेशहर, सुलतानपूर बु, दहीगाव, हिंगणगाव ने, ढोरजळगाव, वरूर, शेवगाव, कांबी, हसनापूर, कोळगाव, शोभानगर, वाघोली येथे भेट देवून पशुसंवर्धन विभागाच्या वतीने सुरु असलेल्या लसीकरण, औषधोपचार, विलगीकरण,बाधित जनावरांच्या परिसरात निर्जंतुकिकरण आदी उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी गटविकास अधिकारी महेश डोके यांच्यासह पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारी कर्मचा-यांची उपस्थिती होती.