घरपट्टीवरून सर्व्हेक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी

वाढीव घरपट्टीविरोधात भाजप, शिवसेना, आरपीआयचे साखळी उपोषण सुरु

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २७ : जो पर्यंत शहरातील नागरिकांची नवीन घरपट्टी रद्द करून जुन्या घरपट्टी प्रमाणे आकारणी होत नाही तो पर्यंत हे साखळी उपोषण सुरूच राहणार आहे. पालिकेचे मुख्याधिकारी व सर्व्हेक्षण करणारे अधिकारी यांनी कामकाजात त्रुटी झाल्याची कबुली दिल्याने भाजप नेते पराग संधान, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई हे उपस्थित अधिकार्यावर चांगलेच भडकले. चुकीचे सर्व्हेक्षण झालेले असेल तर संबंधित ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा आम्ही कारवाई करू असा सज्जड इशारा भाजप, शिवसेना, आरपीआयच्या वतीने देण्यात आला.

कोपरगाव शहरात सन २०२२ -२३ या आर्थिक वर्षाकरिता पालिका प्रशासनाने चारशे ते पाचशे टक्के वाढीव घरपट्टी आकारल्यामुळे नागरीकामध्ये असंतोष निर्माण झाला आहे त्याचा अनुषंगाने मंगळवारी सकाळी अकरा वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या समोर भाजप, शिवसेना, आरपीआयच्या वतीने साखळी उपोषण सुरु करण्यात आले. या उपोषणस्थळी मुख्याधिकारी शांताराम गोसावी, सर्व्हेक्षण करणाऱ्या कंपनीचे अधिकारी आले असता भाजप नेते पराग संधान यांनी शहरातील मालमत्तेचा सर्व्हे चुकीचा कसा केला मुख्याधिकारी व पालिका प्रशासनाने कसे चुकीचे काम केले यावरून सर्वाना धारेवर धरत सर्व्हे करणारे अधिकरी आशिष गेडाम यांची चांगलीच खरडपट्टी केली. सदर उपोषणास युवा नेते विवेक कोल्हे यांनी भेट दिली.

यावेळी माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, राजेंद्र सोनवणे ,तालुकाध्यक्ष दत्ता काले, सेनेचे माजी नगरसेवक योगेश बागुल, कैलास जाधव, आरपीआयचे तालुकाध्यक्ष जितेंद्र रणशूर, अतुल काले, जनार्दन कदम, विजय आढाव, रवींद्र पाठक, माजी नगरसेवक बबलू वाणी, विनोद राक्षे, प्रशांत कडू, शिल्पा रोहमारे, हर्षा कांबळे, विद्या सोनवणे, केशव भवर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

विवेक कोल्हे यावेळी म्हणाले, वाढीव घरपट्टी रद्द केलीच पाहिजे. हि घरपट्टी कोणी व कशी लादली याची पोलखोल ग्रामसभा घेवून करू. तालुक्याचे आमदार हे फोटो सम्राट व खोटे सम्राट आहेत. जनतेची दिशाभूल करणारे ब बालिश बुद्धीने राहून जनतेच्या मुख्य प्रश्नाकडे लक्ष देणारे नसल्याचा आरोप करीत कोल्हे यांनी वाढीव पट्टीवर पालिका प्रशासनाचा समाचार घेतला. पाच नंबर साठवण तलाव झाला पाहिजे मात्र त्यासाठी दहा टक्के निधी पालिकेला भरावा लागणार आहे तो निधी वसूल करण्यासाठी वाढीव घरपट्टी लादली असा आरोप कोल्हे यांनी यावेळी केला. जो पर्यंत हि वाढीव पट्टी रद्द होत नाही तो पर्यंत उपोषण चालूच राहणार आहे. सिल्लोड पालिका जर वाढीव पट्टी कमी करू शकते तर कोपरगाव पालिका का नाही करु शकते असे हि कोल्हे शेवटी म्हणाले.

दरम्यान सायंकाळी मुख्याधिकारी, पालिकेचे इतर अधिकारी व सर्व्हेक्षण अधिकारी यांच्यासमवेत उपोषणस्थळी चर्चा सुरु असताना मुख्याधिकारी यांनी शहरातील मालमत्तेचा सर्व्हे संबधित कंपनी चुकीचा सदर केला आहे त्यात अनेक त्रुटी आहेत त्यामुळे फेर सर्व्हेक्षण करणार आणि संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले. तर संबधित कंपनीच्या अधिकाऱ्यानी सांगितले कि, शहराच्या मालमत्तेचा सर्व्हे करताना काही प्रमाणात चुका झाल्या असून त्याचा फेर सर्व्हे करून देणार असल्याचे काबुल केले. हे ऐकताच उपोषणकर्ते आक्रमक झाले. चाळीस टक्के वाढ तर सोडाच एक टक्का हि वाढ न करता जुन्या पद्धतीने घरपट्टी द्यावी अशी एकमुखी मागणी करून जो पर्यंत लेखी देणार नाही तो पर्यत हे उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे ठणकावून सांगितल्याने आलेले पालिकेचे अधिकारी, कर्मचारी आल्या पावले परत गेले.   

मुख्याधिकारी गोसावी दहा टक्के  एकदम ओके… मुख्याधिकारी गोसावी यांची कार्यप्रणाली संशयास्पद वाटते. पालिकेच्या अनेक ठेकेदारांशी त्याचे आर्थिक हितसंबंध असल्याने मुख्याधिकारी दहा टक्के एकदम ओके असा आरोप युवानेते विवेक कोल्हे यांच्यासह जितेंद्र रणशूर यांनी यावेळी केला. 

 करवढीतील चुका लवकरच दुरुस्ती करुन नागरीकांच्या हितासाठी पारदर्शक प्रयत्न करणार आहे. तेव्हा कोणीही गैरसमज करुन घेवू नये. पालीका प्रशासनाला नागरीकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.