तालुक्यात लम्पी सदृश आजाराने गायीचा मृत्यू

शेवगाव प्रतिनिधी, दि. ३० : लुक्यातील भायगाव येथील रामनाथ आबाजी झेंडे यांच्या मालकीच्या गावरान गायीचा लम्पी सदृश्य आजाराने  उपचारादरम्यान  मृत्यू झाल्याची घटना घडल्याने परिसरातील शेतकरी पशुपालकात  घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यात लम्पी सदृश्य आजाराला बळी पडल्याची ही पाहिली घटना आहे.

    तालुक्यात गायप्रवर्गातील जनावरांची संख्या ७२ हजाराच्या दरम्यान असून तालुक्यात गुरुवार अखेर ६२ हजार ६९१ जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे.

 तालुक्यातील भायगाव येथे पहिल्या जनावराची मृत्यूची नोंद झाल्याने शुक्रवारी गटविकास अधिकारी महेश डोके, तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. चारुदत असलकर, दहीगाव येथील पशुधन विकास अधिकारी डॉ.महेंद्र लाड, भातकुडगाव येथील पशुधन पर्यवेक्षक डॉ.लक्ष्मन नाईक  व त्यांच्या सहका-यांनी भायगाव परिसरातील विविध गावांना भेटी दिल्या.

गेल्या काही दिवसापासून उपचार सुरु असलेल्या व औषधोपचारानंतरही प्रतिसाद देत नसलेल्या जनावरांची माहिती घेवून गावागातील शेतकरी व पशुपालक यांचे प्रबोधन करून जनावरांवरील साथीच्या आजाराचा परिसरात प्रादुर्भाव वाढणार नाही यासाठी घ्यावयाच्या काळजी बाबत संबधितांना महत्वाच्या सूचना दिल्या.

      तालुक्यात आत्तापर्यंत ८७ जनावरांना लम्पी सदृश आजाराची लक्षणे दिसून आली असून यापैकी ५५ जनावरे औषधोपचारानंतर बरी झाली असून सध्या ३१ जनावरांवर उपचार सुरु असल्याची माहिती  पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागातून देण्यात आली. तालुक्यात श्रेणी १ चे ५ तर श्रेणी २ चे ९ असे एकूण १४ पशुवैद्यकीय दवाखाने असून पशुसंवर्धन विभागाचे ३५ अधिकारी कर्मचारी तालुक्यात ही साथ नियंत्रणात आणण्यासाठी परिश्रम घेत आहेत.