शेवगाव प्रतिनिधी, दि. ३ : शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त श्री क्षेत्र अमरापूरच्या श्री रेणुका माता देवस्थानात भाविकांनी काल सातव्या माळेला गर्दीचा उच्चांक केला. रोज पहाटे पासून रात्री उशिरापर्यंत राज्याच्या विविध भागातून श्री मोहटा देवीला पायी येणारे असंख्य भाविक अमरापूरच्या देवस्थानातही श्री रेणुका आईसाहेबांच्या दर्शनाला येत आहेत.
श्री रेणुकामाता देवस्थानात रोज सप्तशती पाठ होत असून वेदशास्त्र संपन्न सच्चिदानंद देवा, तुषार देवा यांच्यासह ११ ब्रह्म वृंद विधीवत पूजा अर्चा करत आहेत. श्रींचे कुंकुमार्चन, हरिद्वार्चन, ऐलार्चन ,पुष्पार्चन, बिल्वार्चन नियमितपणे होत असून शुक्रवारी पाचव्या माळेला रेणुका भक्ताअनुरागी कै. चंद्रकांत दादा भालेराव यांचे पुण्यस्मरणा निमित्त देवस्थानात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
रविवारी श्रींचे शमी अर्चन करून अंगभूत देवता स्थापन करण्यात आल्या. तर आज सोमवारी श्रींचे हिरण्यार्चन व सकाळी नऊला शतचंडी होम आरंभ करण्यात आला.दुपारी साडेतीनला नवरात्री होम आरंभ झाला .संध्याकाळी सातला नवरात्रोत्थापन करून पूर्णाहुती देण्यात आली. ही पूजा रेणुका भक्तानुरागी मंगलताई भालेराव यांचे मार्गदर्शनाखाली डॉ. प्रशांत नाना व सौ. जयंती भालेराव या पतीपत्नीने बांधली.
मंगळवारी श्रीं ची महापूजा व महानवमीनिमित्त सद्गुरु जोग महाराज संस्कार केंद्राचे राम महाराज झिंजुर्के यांचे सकाळी ९ ते ११ हरिकीर्तन होणार असून साडेअकराला महाआरती होईल . त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तर बुधवारी सकाळी विजयादशमीनिमित्त श्रींची महापूजा व संध्याकाळी पाचला भगवान परशुराम पालखी सोहळा व सिमोलंघन करण्यात येणार आहे.
या देवस्थानाचा संपूर्ण परिसर हजारो वृक्षवेलींनी नटल्याने त्याला अत्यंत रमणीनिय अशा पर्यटन स्थळाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे ठिकठिकाणचे अनेक भाविक, सायकल क्लब, पंचक्रोशीतील शैक्षणिक संस्थातील विद्यार्थी सहलीने येथे येत असून आईसाहेबांच्या दर्शनाच्या लाभाबरोबरच पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटीत आहेत. आज पाथर्डी तालुक्यातील काळेगाव,सुसरे ,चितळी पाडळी तर शेवगाव मधील फलकेवाडी, आव्हाने येथील प्राथमिक शाळातील बालगोपालांच्या पायी दिंड्या आल्या. त्यांनी आरतीला उपस्थिती लावून दर्शन घेतले. परिसरातील वृक्षवेलीच्या ढालीत बसून शिक्षक वृंदा बरोबर फराळ केला. या शाळांच्या सहली विविध रंगी ड्रेस कोड मध्ये आल्याने येथील गर्द हिरवाईत विलोभनीय दृश्य भाविकांचे लक्ष वेधून घेत होते.