कोपरगांवप्रतिनिधी, दि. ७ : संजीवनी या नावातच एक सामर्थ्य आहे. त्यामाध्यमांतून बचतगट चळवळीचे रोपटे लावले त्याचे वटवृक्षात रूपांतर झाले असुन शिवणकला अवगत असलेल्या महिला आर्थीकदृष्टया अधिकाधिक सक्षम व्हाव्यात या उददेशांने संजीवनी गारमेंट क्लस्टर अंतर्गत पहिल्या बॅच प्रशिक्षणाचा शुभारंभ भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे याच्या हस्ते नुकताच करण्यांत आला.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात ३ कोटी २५ लाख रूपये खर्चाचे अत्याधुनिक मशिनरीने सुसज्ज संजीवनी गारमेंट क्लस्टर मंजुर करण्यांत आले. महाराष्ट्र राज्य औद्योगिक सामुहिक विकास योजना व जिल्हा उद्योग केंद्र अहमदनगर यांच्या सहकार्याने सौ. स्नेहलता कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन गारमेंट क्लस्टर प्रशिक्षणाचा शुभारंभ करण्यांत आला. याप्रसंगी ओवम फॅशनचे राहुल गलांडे व आकाश चव्हाणके यांनी पहिल्या टप्प्यात उपस्थित महिलांना लेडीज वेअर, फॅशन डिझाईन, शर्ट, पॅन्ट, टी शर्ट, एम्ब्रायडरी आदि शिवणकलेचे प्रशिक्षण देण्यात आले.
स्नेहलता कोल्हे याप्रसंगी बोलतांना म्हणाल्या की, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व युवानेते विवेक कोल्हे यांच्या माध्यमांतुन येथील महिला बचतगट चळवळ जिल्हयातच नव्हे तर राज्यस्तरावर नांवलौकीकास्पद आहे. महिला तिच्या संसार प्रपंचाला छोटया छोटया कामातुन आर्थीक हातभार लावीत असते.
महिलागट आणि त्यातुन केलेली बचत ही त्यांच्या भावी काळाची पुंजी आहे. वाढदिवसापेक्षा आपण नेहमीच सत्कार्याला महत्व देवुन त्यानुरूप समाजहिताच्या कामांचा पुढाकार घेत कार्यरत आहे. एक महिला शिकली तर ती स्वतःच्या कुटूंबाबरोबरच परिसराचा आणि तालुक्याचा कायापालट करत असते.
प्रारंभी संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ. रेणुकाताई विवेक कोल्हे यांनी प्रास्तविकात महिला बचतगट प्रगतीचा आढावा देवुन महिलांनी आपल्या घरादाराच्या प्रगतीसाठी पुढाकार घेवुन भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली चालविलेल्या बचतगट चळवळीचा सर्वार्थाने राज्यात नावलौकीक वाढविण्यासाठी सातत्य ठेवावे असे सांगितले.
याप्रसंगी क्लस्टरच्या अध्यक्षा मोनिका संधान, सचिव मेघना डुंबरे, अनुपमाताई सोनवणे, शकुंतला मोगल यांच्यासह पंचकोशीतील भगिनी, बचतगटाच्या सर्व महिला सदस्या मोठया संख्येने उपस्थित होत्या. मेघना डुंबरे यांनी आभार मानले.