व्होकल फॉर लोकलच्या माध्यमातून बचत गटांना व्यवसायाची संधी – चैतालीताई काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १० :  प्रकाशाचा उत्सव असलेला दिवाळी सण काही दिवसांवर आला आहे. मागील दोन वर्षापूर्वी सण उत्सवावर असणारे कोरोनाचे मळभ बऱ्यापैकी दूर झाल्यामुळे वातावरणही उत्साहीत झाले असून नागरिक देखील मोठ्या संख्येने खरेदीसाठी बाहेर पडणार असून बाजारपेठेत मोठी आर्थिक उलाढाल होणार आहे.

या उलाढालीचा बचत गटाच्या महिलांना देखील आर्थिक फायदा व्हावा यासाठी प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली बचत गटांसाठी कृष्णाई मंगल कार्यालयात स्टॉल्स उपलब्ध करून देणार आहे अशी माहिती जिल्हा बँकेच्या संचालिका सौ. चैतालीताई काळे यांनी दिली आहे.

   मागील दोन वर्ष आलेल्या कोरोना वैश्विक आपत्तीमुळे बाजारापेठेतील चैतन्य गायब झाले होते. मात्र यावर्षी हि आपत्त्ती बहुतांश प्रमाणात कमी झाली आहे. काही दिवसांवर दिवाळी सण येवून ठेपला आहे. दिवाळीपूर्वी बाजार पेठेत आकाश कंदील, पणती, रांगोळी, सुगंधी तेल, दिवाळीचा तयार फराळ, सुंगंधी अगरबत्ती, मेणबत्ती, लक्ष्मी पूजन साहित्य आदी वस्तूंची मोठ्या प्रमाणात नागरिक खरेदी करीत असतात.

या सर्व वस्तू बचत गटाच्या महिला तयार करीत असून त्यांच्या मालाला शाश्वत ग्राहक उपलब्ध होवून बचत गटांचे आर्थिक हित साधण्यासाठी प्रियदर्शनी महिला मंडळाच्या माध्यमातून व्होकल फॉर लोकल हि संकल्पना राबविण्यात येत आहे.

या संकल्पनेतून बचत गटाच्या महिलांनी तयार केलेले आकाशकंदील, पणती, रांगोळी, सुगंधी तेल, दिवाळीचा तयार फराळ, सुंगंधी अगरबत्ती, मेणबत्ती आदी वस्तू ग्राहकांना एकाच ठिकाणी उपलब्ध होवून खरेदीसाठी होणारी नागरिकांची पायपीट देखील होणार नाही. बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या मालाची देखील मोठ्या प्रमाणात विक्री होवून त्यांचा देखील आर्थिक फायदा साधला जाणार आहे.

त्यामुळे बचत गटाच्या महिलांनी या संधीचा फायदा घेवून तयार माल विक्रीसाठी आपले स्टॉल्स लवकरात लवकर आरक्षित करावे. शनिवार दि.१५ व रविवार दि.१६ या दोनच दिवस बचत गटांना कृष्णाई मंगल कार्यालय कोपरगाव येथे आपल्या तयार मालाची विक्री करता येणार आहे. 

त्यासाठी ८२०८००००६९, ९१४५६१११६८,९५२७७१६२६९ या मोबाईल नंबरवर बचत गटाच्या महिलांनी संपर्क करावा. नागरिकांनी देखील दिवाळीची खरेदी या ठिकाणी करून चांगल्या दर्जाच्या वस्तू माफक दरात खरेदी कराव्यात असे आवाहन सौ. चैतालीताई काळे यांनी केले आहे