कोपरगाव प्रतिनिधी, दि. १३ : नगर मनमाड महामार्ग रस्ते वाहतुकीस अत्यंत धोकादायक बनला आहे या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले आहेत त्यातून अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे, यात निरपराध व्यक्तींचे बळी जाऊ लागले आहेत, माता भगिनींना पायी चालणे देखील मुश्किल झाले आहे, साईबाबांची शिर्डी याच रस्त्यावर असून देश-विदेशातील भाविक याा मार्गाने दर्शनासाठी येत असतात, तेव्हा शासनाने या रस्त्याचे खड्डे तातडीने बुजवावे या मागणीसाठी भाजपच्या सचिव सौ स्नेहलताताई कोल्हे यांनी गुरुवारी भर पावसात नगर-मनमाड महामार्गावर लायन्स मूकबधिर विद्यालयाजवळ तीन तास हे आंदोलन केले.
खड्डे बुजवाा जीव वाचवा या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. राष्ट्रीय महामार्ग विभाग नाशिकचे कार्यकारी अभियंता नितीन पालवे यांना यावेळी निवेदन देण्यात आले. त्याचा स्वीकार संगमनेर कार्यालयाचे उपविभागीय अभियंता एस.टी. बडगुजर यांनी केला.
कोल्हे याप्रसंगी बोलताना म्हणाला की, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्याच्या कामाचे निवीदा नुकत्याच काढलेल्या आहे. मात्र सध्या दिवाळी सण जवळ आला आहे, जिल्ह्याच्या ठिकाणी कामासाठी सर्वांनाच नित्यनेमाने प्रवास करावा लागत आहे, गर्भवती महिलांना दवाखान्यात ने आण करताना रस्त्याच्या खड्ड्यामुळे अतोनात त्रास सहन करावा लागत आहे, शेतीच्या कामाची लगबग वाढली आहे.
रात्री अपरात्री प्रवास करताना रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज येत नाही, साखर कारखान्यांचे गळीत हंगाम तोंडावर आले आहेत, अनेकांचे हात, पाय, कंबर, मणके मोडले असून कायमचे जायबंदी होण्याचे प्रमाण वाढले आहे. हे खड्डे तातडीने बुजवले गेले नाहीत तर त्यातून अपघाताचे प्रमाण दुप्पट वाढेल प्रवाशांचा बळी जाईल. त्यासाठी तातडीची निकड म्हणून हे खड्डे तातडीने वाजवावे असे स्नेहलता कोल्हे म्हणाल्या.
याप्रसंगी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रमेश घोडेराव संचालक विश्वासराव महाले, सतीश आव्हाड, बापूसाहेब बाराहाते, आप्पासाहेब दवंगे, शिवाजीराव वक्ते, मधुकरराव वक्ते, प्रदीप नवले, बाळासाहेब वक्ते, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शरद थोरात, भाजपचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष दत्ता काले, शिल्पा रोहमारे, वैशाली आढाव, बाळासाहेब पानगव्हाणे, प्रहार संघटना, रामदास शिंदे, दीपक चौधरी, रामभाऊ कासार, भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष विक्रम पाचोरे, बाबा दहे, विनोद राक्षे, भीमा संवत्सरकर, यादवराव संवत्सरकर, यांच्यासह विविध सामाजिक संघटना विविध संस्थांच्या आजी-माजी पदाधिकारी आंदोलन कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलीस निरीक्षक वासुदेव देसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला.
लहान मुले ही या आंदोलनात सहभागी झाली होती भर पावसात भजन म्हणत आंदोलन केले. ठिय्या आंदोलनामुळे नगर मनमाड राष्ट्रीय महामार्गाची वाहतूक मोठ्या प्रमाणात खोळंबली होती ती सुरळीत करण्यासाठी पोलिसांची कसरत सुरू होती. शाळा महाविद्यालयाच्या मुलांना घरी जाण्यास उशीर झाला.