स्व. कोल्हे साहेब यांना जलजीवन मिशन पाणीयोजनेचे भूमीपूजन करून अभिवादन

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २४ : माजी मंत्री स्व.शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या ९४ व्या जयंतीनिमित्त शिंगणापूर येथे ३० कोटी ३० लाख रुपयांचे जलजीवन पाणी योजनेचे भूमिपूजन मा.आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले.

विविध आंदोलन, मोर्चे सत्याग्रह करून पाण्यासाठी लढा उभारणारे नेते म्हणून स्व.शंकररावजी कोल्हे साहेब यांची ओळख आहे. राजकीय फायदा तोटा विचारात न घेता शेतकरी कष्टकरी यांना पाणी मिळाले पाहिजे यासाठी त्यांचा अट्टाहास कायम होता. स्व.कोल्हे साहेब यांची जयंती पाणी योजनेचे भूमीपूजन होऊन साजरी होणे ही त्यांना खरी आदरांजली आहे. शेती, पाणी, वीज, सहकार, रोजगार, उद्योग, शिक्षण हे कोल्हे साहेबांचे जिव्हाळ्याचे विषय होते. सातत्याने नाविन्यपूर्ण बदल व प्रगत विचार अमलात आणून सर्वसामान्यांचे आयुष्य सुखकर करण्याचे काम साहेबांनी केले.

शिंगणापूर ही कोल्हे साहेबांची कर्मभूमी आहे. कोल्हे साहेब यांनी संजीवनी उद्योग समूह, शिक्षण संस्था, कॉल सेंटर आदी उभारून कायापालट करून रोजगार निर्मितीवर भर दिला. ज्यामुळे मोठा विकास घडून आला आहे. भविष्यकाळात भेडसावणाऱ्या समस्या निर्माण होण्याआधीच उपाययोजना करून काळाच्या पुढे जाऊन काम करणारे दूरदर्शी नेतृत्व म्हणून स्व.कोल्हे साहेब यांचे पाण्याविषयी असलेले काम अतुलनीय आहे.

स्व.कोल्हे साहेब यांचे मतदारसंघात शेती आणि पिण्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी असणारे योगदान अद्वितीय आहे.गोदावरी नदीवरील पहिला हिंगणी बंधारा कोल्हे साहेबांनी स्व खर्चाने बांधला होता राज्यभर त्याची दखल घेतली गेली होती, असे अनेक लहान मोठे बंधारे, पाटपाणी लढा, खडा आंदोलन, मोर्चे, रास्तारोको असे अगणित संघर्ष साहेबांनी पाण्यासाठी केले.

साहेबांचे विचार आणि संस्कारांच्या शिदोरीवर माझे कायमच प्रयत्न आणि पाठपुरावा नागरिकांना शुद्ध आणि स्वच्छ पाणी मिळण्यासाठी आहे, ज्याचे फलित पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस केंद्र व राज्य सरकार यांच्या माध्यमातून शिंगणापूर गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भविष्यातील अनेक पिढ्यांसाठी सुटला जाणार आहे. तसेच मतदारसंघातील अनेक गावांत हर घर जल हर घर नल या मोदींजींच्या संकल्पनेतून कोट्यावधी रुपयांच्या जलजीवन मिशन पाणीयोजना मंजूर झाल्या आहेत याचे मनस्वी समाधान आहे असे प्रतिपादन सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी केले आहे.

स्व.शंकररावजी कोल्हे साहेब यांचा कृषी, सहकार, पाणी, उद्योग, शिक्षण,पर्यावरण, आरोग्य आदिंसह सर्वच क्षेत्रात अभ्यास होता. कोपरगाव मतदारसंघातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी कामातुन आपली ओळख निर्माण केली होती. केवळ आश्वासन नव्हे तर ठोस कृती करून आक्रमक बाणा असणारे दूरदर्शी नेते म्हणून सर्वत्र त्यांचा प्रभाव आजीवन राहिला आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त पाणी योजना भूमिपूजन करून शिंगणापूर गावाच्या वतीने कोल्हे साहेबांप्रति उल्लेखनीय आदरांजली अर्पण केली आहे.

याप्रसंगी उपस्थित मच्छिंद्र लोणारी, सरपंच डॉ. विजय काळे, उपसरपंच रत्ना संवत्सरकर, माजी सरपंच सुनिता भीमराव संवत्सरकर, उपसपंच पुणम तुळसकर, राजेंद्र लोणारी, यादवराव संवत्सरकर, कैलास संवत्सरकर, मा.पंचायत समिती सदस्य सुनिता संवत्सरकर, सोसायटी चेअरमन यशवंत संवत्सरकर, संजय तुळसकर, लक्ष्मीकांत संवत्सरकर, श्याम संवत्सरकर, भाऊसाहेब वाघ, रंगनाथ संवत्सरकर, अंकुश कुऱ्हे, भाऊलाल कुऱ्हे, शेखर कुऱ्हे, बापु गिते, प्रसाद आढाव, दिनकर गिते, दत्तु संवत्सरकर, आविनाश संवत्सरकर, प्रमोद संवत्सरकर, भाऊसाहेब संवत्सरकर, महाराष्ट्र जलजिवन प्राधीकरणचे कदम साहेब, ग्रामविकास आधीकारी दिलीप वारकर आदींसह मान्यवर व शिंगणापूर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.