स्वामी सेवेत जनसहभाग महत्वाचा – विवेक कोल्हे 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १८ :  दैनंदिन जीवनांत संघर्ष, संकटे ही ठरलेली असतात त्यातून समर्थपणे मार्गाक्रमण करण्यासाठी दैवी शक्ती कामी येते, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी संजीवनी परिसरासह तालुकावासिय जनतेच्या जीवनांत अमुलाग्र बदल घडवून आणला तोच वसा घेवुन पुढे काम करतो आहे, स्वामी सेवेत सर्वांचा जनसहभाग महत्वाचा असल्याचे प्रतिपादन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केले.

            तालुक्यातील श्रीक्षेत्र शिंगणापुर सहजानंदनगर परिसरात श्री हनुमान मंदिरात सालाबादप्रमाणे याही वर्षी स्वामी समर्थ पुण्यतिथीचे औचित्य साधून गुरूचरित्र पारायण सोहळयाचे आयोजन करण्यांत आले होते त्याची सांगता विवेक कोल्हे व त्यांच्या सुविधपत्नी सौ. रेणुका कोल्हे या उभयतांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आली त्याप्रसंगी ते बोलत होते. गेल्या अठरा वर्षात पस्तीस गुरूचरित्र पारायणे येथे संपन्न झाली. 

            याप्रसंगी शिंगणापुर प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने डॉ. कृष्णा पवार यांनी शासनाचे अभा आरोग्य कार्ड नोंदणीकरणाची माहिती देवुन उपस्थितांना मोफत आरोग्य तपासणी सह औषधांचे वितरण केले. 

            संचालक सर्वश्री. विश्वासराव महाले, बाळासाहेब वक्ते, शिवाजीराव वक्ते, बापूसाहेब बारहाते, रमेशराव आभाळे, बाळासाहेब पानगव्हाणे, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विक्रांत् पाचोरे, माजी सरपंच यादवराव संवत्सरकर, अशोकराव लोहकणे, मुख्य अभियंता के. के. शाक्य, उस व्यवस्थापक जी. बी. शिंदे, उसविकास अधिकारी शिवाजीराव देवकर, कामगार कल्याण अधिकारी एस. सी. चिने यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी संचालक, खाते प्रमुख, उपखातेप्रमुख आदि समर्थ सेवेकरी याप्रसंगी उपस्थित होते. 

            प्रारंभी कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार प्रास्तविक करतांना म्हणाले की, समर्थ सेवेतुन प्रत्येकाच्याभोवती सुरक्षा कवच तयार होत असते. जीवनाच्या रथाला गुरू मार्ग दाखवतो त्यातुन जन्मत:, शिक्षण समाजसेवा, प्रतिभासंपन्न व अलौकीक ज्ञानाची प्राप्ती होते. मनुष्याने जीवन कसं जगावे याची शिकवण गुरूचरित्रातुन मिळते, संत समाजाला घडवत असतात. 

  कोल्हे पुढे म्हणाले की, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यास संकटांचा संघर्ष नविन नाही. माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्याकडुन साखर कारखानदारीसह सामाजिक कार्याचा जो वसा मिळाला आहे त्यातुन पुढे जाण्यासाठी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपाच्या प्रदेशसचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे यांच्यासह सर्व संचालकांसह तालुकावासियांचे सतत मार्गदर्शन मिळते.

विज्ञान जेथे थांबते तेथुन पुढे अध्यात्माचा प्रवास सुरू होतो आणि हीच अध्यात्माची सेवा सतत संकटे हरण करण्यासाठी दैवी शक्तीच्यारूपाने आम्हांस प्रेरणा देते असेही ते म्हणाले. १४० पारायणार्थीनी यात सहभाग नोंदविला. सुत्रसंचलन संगणक विभागाचे चंद्रकांत जाधव यांनी करून आभार मानले. महिलांसह तरूणवर्गाची लक्षणीय उपस्थिती होती.