शिर्डी प्रतिनिधी, दि. ९ : शिर्डी उपविभागात मोटरसायकल चोरीच्या घटनांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत ३० % घट झाली आहे. कोपरगाव शहर, कोपरगाव तालुका, शिर्डी, राहाता आणि लोणी पोलीस स्टेशन हद्दीत ही घट झाली आहे. या वर्षभरात २४१ पैकी ५६ मोटारसायकल शोधण्यात पोलीसांना यश आल्याची माहिती शिर्डीचे पोलीस उपअधिक्षक शिरीष वमने यांनी दिली. या यशस्वी कारवाईमागे पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांचे मार्गदर्शन आहे.
पोलिसांच्या सक्रिय पेट्रोलिंग, सीसीटीव्ही कॅमेरे लावणे आणि विना नंबर प्लेटच्या वाहनांवर कारवाई यामुळे ही घट शक्य झाली आहे. विशेषत:, गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत मोटरसायकल चोरीच्या घटनांमध्ये ६० % घट झाली आहे. शिर्डीचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, प्रदीप देशमुख (वाहतुक), संदीप कोळी(कोपरगाव तालुका), भगवान मथुरे (कोपरगाव शहर), रणजित गलांडे (राहाता), कैलास वाघ (लोणी) या अधिकाºयांनीही विशेष परिश्रम घेतले. उपविभागीय अधिकारी वमने यांनी या अधिकाºयांच्या कामाची प्रशंसा केली आहे.
सन २०२३ मध्ये ३४९ मोटार सायकलची चोरी झाली, २०२४ मध्ये ही संख्या २४१ पर्यंत कमी झाली. याशिवाय सन २०२३ मधील ऑक्टोंबर ते डिसेंबर या काळात ९४ मोटार सायकल चोरीस गेल्या होत्या. २०२४ मध्ये याच कालावधीत ही संख्या ४० वर आली. ही घट जवळपास ६० टक्के आहे़ पोलिसांनी विना नंबर प्लेटच्या २४० वाहनांवर कारवाई करून १,२९,५०० रुपये दंड आकारला आहे.
शिरीष वमने, पोलीस उपअधिक्षक- मोटरसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी आम्ही अनेक उपाययोजना राबविल्या आहेत. यात सीसीटीव्ही कॅमेरे लावणे, संशयित वाहनांची तपासणी, नाकाबंदी करणे आणि गुन्हेगारांना पकडण्यासाठी विशेष पथके तैनात करणे यांचा समावेश आहे. या सर्व प्रयत्नांना यश मिळाल्याने चोरीच्या घटनांमध्ये मोठी घट झाली आहे. पोलिस प्रशासन पुढेही मोटरसायकल चोरीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहील.