समताने विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी अनेक संधी उपलब्ध करून दिल्या – पोलीस निरीक्षक रामराव ढिकले

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १८ : समता इंटरनॅशनल स्कूल शिक्षण क्षेत्रात अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या आयुष्याला शिस्तबद्ध अशा प्रकारची दिशा देण्याचे काम करत आहे. तसेच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक सहली, वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करुन बाहेरील जगाशी सांगड घालण्याचा प्रयत्न सतत चालू असतो. समता पॅटर्न द्वारा समता इंटरनॅशनल स्कूलने विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.असे मत कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी व्यक्त केले.

समता इंटरनॅशनल स्कूलच्या इ.१० वी व इ.१२ वी तील गुणवंत विद्यार्थी व पालकांचा सन्मान सोहळा प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, प्रेरणा पतसंस्थेचे चेअरमन सुरेश वाबळे, समता स्कूलचे अध्यक्ष काका कोयटे, कोपरगाव नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा सौ. सुहासिनी कोयटे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्व.यशवंतराव चव्हाण समता सहकार सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, समताच्या गुणवंत विद्यार्थ्यांप्रमाणे त्यांचे पालक ही गुणवंत आहे. त्यांनी या स्पर्धेच्या युगात पाल्यावर आपल्या जास्त अपेक्षा न लादता त्यांना स्वातंत्र्य देऊन त्यांच्या उज्वल भविष्यासाठी सहकार्य करावे. विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाच्या आहारी न जाता, त्या आभासी जगापासून दूर राहणे गरजेचे आहे. शिक्षणासाठी खूप फॅकल्टी आहेत. योग्य मार्गदर्शन घेऊन फॅकल्टी निवडावी. समता इंटरनॅशनल स्कूलच्या प्रगतीत शिक्षकांसोबतच कोयटे परिवाराचे योगदान ही खुप मोठे आहे. ते समता इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून सुजाण नागरिक घडवत आहेत. त्यांनी लावलेल्या शिस्तीचा अवलंब करून समता इंटरनॅशनल स्कूलचा झेंडा प्रत्येक क्षेत्रात उभारावा.

प्रमुख पाहुण्यांचा सत्कार समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक काका कोयटे यांच्या हस्ते करण्यात आला. स्वागत व परिचय स्कूलचे उपप्राचार्य श्री.समीर अत्तार यांनी करून दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या सौ. हर्षलता शर्मा यांनी केले.

मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करताना कार्यकारी विश्वस्त सौ.स्वाती कोयटे म्हणाल्या की, आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुणवत्तापूर्ण शिक्षण देत एक परिपूर्ण विद्यार्थी म्हणून आम्ही तुम्हाला घडवले. या पुढील प्रवासात सुद्धा शैक्षणिकदृष्ट्या येणाऱ्या प्रत्येक अडचणीत आम्ही तुमच्यासोबत राहणार आहोत. आम्ही तुमच्या पंखामध्ये बळ देण्याचे काम केले, आता तुम्हाला उंच भरारी घ्यायची आहे.

पालक बाबासाहेब बेरगळ मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, माझ्या पाल्यासाठी समता परिवार खूप महत्त्वाचा आहे. यशस्वी विद्यार्थ्यांच्या तसेच माझ्या पाल्याच्या यशामध्ये समता इंटरनॅशनल स्कूलची मेहनत महत्त्वाची आहे.तसेच इ.१० वीतील तनिषा जैन, इ. १२ वीतील श्रुतिका देशमुख, गार्गी कदम, प्रीती परदेशी, ओम जाधव यांनी ही मनोगतातून आजपर्यंतच्या प्रवासात समता परिवाराने जे संस्कार आमच्यावर केले ते पुढील प्रवासातही आम्हाला उपयोगी पडतील.अशी भावना व्यक्त केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षिका सौ.शाद जलीस यांनी केले. या प्रसंगी इ.१० वी व इ.१२ वीतील गुणवंत विद्यार्थी आणि पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. उपस्थितांचे आभार शिक्षिका सौ.सारीका अग्रवाल यांनी मानले.