सिनेस्टाईलने शहर पोलीसांनी पकडले चोरांना
कोपरगाव प्रतिनिधी दि. २३: प्रवास करण्यासाठी लोकांना निट मोटारसायकल मिळत नाही पण चोरांनी आलिशान कार शेळ्या चोरण्यासाठी केली आहे. एका आलिशान कारमध्ये शेळ्यांना बसवून चोर घेवून जात असल्याची माहीती पोलीसांना मिळताच पोलीसांनी सिनेस्टाईलने चारचाकी गाडीचा पाठलाग केला. शहराच्या मुख्य भागात हा सर्व प्रकार सोमवारी सकाळी सुरु होता. अखेर मोठ्या शिताफीने पोलीसांनी पाठलाग करुन चारचाकी गाडी सह दोघांना ताब्यात घेवून तीन शेळ्यांची सुटका केली.
या संदर्भात पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्याकडून मिळालेली अधिक माहीती अशी की, कोपरगाव शहरात सोमवारी आठवडे बाजार असल्याने शहरातील बैल बाजार रोड येथे जनावरांचा मोठा बाजार भरतो त्या बाजारात एक आलिशान कार मधुन शेळ्या घेवुन येत असल्याची माहीती गुप्त बातमीदारांकडून मिळाली. पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी पोलीस यंञणा तातडीने सतर्क करून एक पथक पाठवले.
यामध्ये पोलीस कर्मचारी यमुनाजी सुंबे व तमनर शेवाळे यांनी शेळ्या घेवून जाणाऱ्या गाडीवर पाळत ठेवली. त्यांना बैल बाजार येथे पांढऱ्या रंगाची एम एच ०४ एफ आर ४२७९ क्रमांकाच्या चारचाकी गाडीत तीन व्यक्ती तीन शेळ्या घेवून जात असल्याची खाञी पटली. पोलीसांनी गाडीचा पाठलाग सुरु केला. चोरांना पोलीस आपला पाठलाग करत आल्याचे लक्षात येताच ते परत शहराच्या बाहेर न घण्यासाठी गर्दीतून सुसाट गाडी चालवत निघुन जात होते. अगदी चिञपटाला लाजवेल असा पाठलाग सुरु झाला.
चोरांनी शहरातील लोकशाही अण्णाभाऊ साठे पुतळ्याच्या जवळ पोलीसांना चकवा देण्याच्या प्रयत्नात त्यांची चारचाकी गाडी रस्त्यावरील दुभाजकाला धडकली. तितक्यात पाठलाग करणारे दोन पोलीस कर्मचारी पोहचले आणि गाडीतल्या दोघांना पकडले परंतू त्यापैकी एक चोर पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलीसांनी चारचाकी गाडीची झाडाझडती घेतली असता चोरून आनलेल्या तीन शेळ्या आढळून आल्या.
पकडलेली गाडी शेळ्या व चोरांना पोलीस स्टेशनमध्ये घेवू गेले तिथे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी चोरांना पोलीसी खाक्या दाखवताच गाडीतल्या शेळ्या ह्या विविध ठिकाणातील शेतकऱ्यांच्या चोरल्याचे चोरांनी कबुल केले. पळून गेलेल्यासह या प्रकरणात चौघांचा सामावेश असुन शेळ्या चोरणारे चोर राहता तालुक्यातील असल्याची प्राथमिक माहीती देण्यात आली. दोघां चोरांचा शोध घेण्यासाठी पोलीसांनी पकडलेल्या चोरांची नावे गुप्त ठेवली आहेत.
दरम्यान सोमवारी पहाटे कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील शेतकरी बाळासाहेब बाबुराव नन्नोरे यांच्या घरासमोरील पञ्याच्या शेडमध्ये बांधलेल्या दोन शेळ्या अंदाजे ११ हजार रुपये किंमतीच्या अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची तक्रार शहर पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली आहे. यावरुन चोरट्यांनी पहाटे चोरलेल्या शेळ्या आठवडे बाजारात विकण्याची तयारी केली होती, पण पोलीसांच्या सतर्कतेमुळे तीन शेळ्यांचा जीव वाचला आणि शेळ्या चोरणारी टोळी गजाआड झाली. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.