उपोषण कर्त्यावर लाठीहल्ला करण्याचा आदेश देणाऱ्याचे निलंबन करून उच्च स्थरीय चौकशी व्हावी

शेवगाव सकल मराठा समजाची मागणी

शेवगाव प्रतिनिधी, दि . २ : जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणासह इतर काही मागण्यासाठी सनदशीर मार्गाने आंदोलक उपोषण करत असतांना त्यांच्यावर झालेल्या लाठी माराच्या घटनेचा शेवगाव शहर व तालुक्यातील सकल मराठा समाज सेवा संघाच्या वतीने जाहीर  निषेध करण्यात आला. यावेळी सेवा संघाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयात जाऊन या घटनेची सखोल उच्चस्तरिय चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन दिले.

       या निवेदनात म्हटले आहे की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आमरण उपोषण, लोकशाही मार्गाने सुरू होते. परंतु त्यावेळी अचानक मराठा समाज बांधवांवर अमानुष लाठीमार केला गेला. त्यामध्ये अनेक समाज बांधव महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक जखमी झाले असून या घटनेचा जाहीर निषेध आम्ही सर्व सकल मराठा बांधव करत असून लाठीमार करण्याचा आदेश देणाऱ्या संबंधित वरिष्ठ शासकीय अधिकारी यांना तात्काळ निलंबित करून या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी.

       यावेळी शेवगावच्या सकल मराठा समाज बांधवानी क्रान्ती चौकातून अत्यंत शिस्तबद्धपणे तहसील कार्यालयात येऊन नायब तहसीलदार रविद्र सानप याचे कडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नांवे असलेले निवेदन दिले. दरम्यान काल काही समाज कंटकानी बीड जिल्ह्यात एसटी गाड्याची जाळपोळ केल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शेवगाव आगारातून दिवसभर एकही बस रस्त्यावर धावली नाही. त्यामुळे शेवगाव आगाराला किमान पाच लाखाला फटका बसला.