दुष्काळी परिस्थितीत शासन, प्रशासन बळीराजाच्या पाठीशी असायला हवे

शेवगाव प्रतिनिधी, दि. ६ :  तब्बल दीड महिन्यापासून शेवगाव तालुक्यात पावसाने हुलकावणी दिली असल्याने खरिप पिके धोक्यात आली आहेत. संपूर्ण तालुक्यात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली. हातची पिके गेली. मोलामहागाच्या बी बियाण्याचा झालेला खर्च देखील निघणार नाही अशा परिस्थितीत शासन व प्रशासन बळीराजाच्या पाठीशी असायला हवे.

मात्र शेवगाव तालुक्यातील सहा मंडळापैकी भातकुडगाव, चापडगाव व ढेरजळगाव शे या तीन मंडळातील गांवांचा समावेश पिक विम्यासाठी  करण्यात न आल्या बद्दल माजी आमदार चंद्र शेखरघुले पाटील यांनी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची आज बुधवारी समक्ष भेट घेऊन  तालुक्यातील सर्व मंडळाचा पिक विम्यासाठी सरसकट समावेश करण्यात यावा अशी आग्रही मागणी केली आहे.

      यावेळी मंत्री मुंडे यांनी देखील  सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधितांना दिल्याची माहिती माजी आ घुले यांनी दिली. या संदर्भात शेवगाव तालुक्यातील  सर्व सहाही मडळात पावसाने दडी मारली असतांना भातकुडगाव मंडळात ज्या ठिकाणी पर्जन्यमापक यंत्र आहे, तेथे किरकोळ पाऊस पडल्याचा आधार घेऊन तालुका कृषी  विभागाने तेथील पंचनामे थांबविले.

  या मडळात  समाविष्ठ असलेल्या सर्वच गावात पाऊस पडला नसल्याने पूर्ण महसुली मंडळात पावसाचा खंड गृहित धरून तालुक्यातील सर्वच शेतकर्याना सरसकट ॲग्रीम पिक विमा मंजूर करण्याची मागणी करणारे निवेदन यावेळी माजी आ. घुले पाटील  यांनी कृषी मंत्री  मुंडे यांची बुधवारी मंत्रालयात समक्ष भेट घेऊन  दिले .