कोपरगाव प्रतिनिधी, दि. २४ : कोपरगांव तालुका पंचायत समितीचे माजी सभापती भागवत यमाजी काळवाघे (९०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे. श्री साईबाबा संस्थान शिर्डीच्या कामगार विभागाचे चौकशी अधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे अभियंता किरण, बांधकाम व्यवसायिक हर्षल यांचे ते वडील होते.
कै. भागवतराव काळवाघे यांच्या पार्थीवावर शिंगवे येथे अंत्यसंस्कार करण्यांत आले. १९८१ ते १९८६ या काळात त्यांनी तालुका पंचायत समितीचे सभापती, श्रीगणेश सहकारी साखर कारखान्यांचे संचालक तर माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचे विश्वासु सहकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले. १९७४ ते २०२२ या ४८ वर्षाच्या कालावधीत त्यांनी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांच्या कामगार विभागाचे चौकशी अधिकारी म्हणूनही काम पाहिले होते. तसेच प्रसिद्ध वकील, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्राशी त्यांचा निकटचा संबंध होता. राहाता तालुक्यातील शिंगवे गांवचे सुपुत्र तर ग्रामपंचायत सोसायटीचे सदस्य म्हणूनही त्यांच्या कार्याचा लौकीक होता.
त्यांच्या निधनाबददल कोपरगाव वकील संघाचे वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी जिल्हा न्यायाधीश स.बा कोऱ्हाळे, बि.एम. पाटील, दिवाणी न्यायाधीश स्वरूप बोस, भगवान पंडित, एस.बि. देसाई, श्रीमती एस. एम बनसोड यांचे समवेत वकील संघाचे अध्यक्ष विधिज्ञ शिवाजी खामकर, उपाध्यक्ष मनोज कडू, अशोकराव वहाडणे, भास्करराव गंगावणे, शंतनू धोर्डे, शिरीष लोहाकने, महेश भिडे, नितीन गंगावणे, दिपक जाधव, एस. एम. मोकळ यांचेसह अनेक वकील, कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव सौ स्नेहलताताई कोल्हे, संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष नितीनदादा कोल्हे, जिल्हा बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे आदिंनी शोक व्यक्त केला.