लम्पीचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रशासन सज्ज

सुट्टीच्या दिवशीही ६,१४६ पशूंचे केले लसीकरण

शेवगाव प्रतिनिधी, दि. १९ :  तालुक्यातील हसनापूर येथील एका शेतकऱ्यांच्या बैलाला लम्पी सदृश रोगाने पछाडल्याचे आढळल्याने तालुका प्रशासन अधिक अलर्ट झाले आहे. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे लसीकरण मोहिमेत व्यत्यय येत असला तरी हा रोग होऊच नये म्हणून गटविकास अधिकारी महेश डोके, तालुका पशुधन विकास अधिकारी चारुदत्त असलकर यांचे मार्गदर्शना  खाली काल रविवारी सुट्टीचा दिवस असतानाही पशुसंवर्धन विभागाच्या विविध पथकांनी या पंचक्रोशीतील तब्बल ६ हजार १४६ जनावरांचे लसीकरण केले आहे.

       पशुधनावरील लम्पी रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून तालुका पशुसंवर्धन विभागाने तालुक्यातील गाय वर्गातील सर्वच्या सर्व ७० हजार ६८७ गाय वर्गीय  जनावरांची लसीकरण मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला असुन  शनिवारी उपलब्ध झालेल्या ३० हजार लसीसह आत्ता पर्यंत  लसीचे ४१ हजार गोट  पॉक्स लसीचे  डोस उपलब्ध झाले आहेत. शेवगावसह तालुक्यात  भातकुडगाव, शहरटाकळी, वरूर, हसनापूर, कांबी, बोधेगाव परिसरातील शोभानगर या ६ ठिकाणच्या परिसरात लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे.     

         तालुक्यातील हसनापूर येथील  शेतक-याच्या  बैलामध्ये  लम्पी चर्मरोगाची  लक्षणे आढळून आल्याने तालुक्यात या आजाराच्या पशुधनाची संख्या सहा वर  पोहचली आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी पशुपालकात काहीसे घबराटीचे वातावरण निर्माण झाले.  भातकुडगाव येथील दोन  व शहरटाकळी येथील एक अशी तीन जनावरे उपचारानंतर बरी झाली आहेत. आता नव्याने आढळून आलेल्या हसनापूरसह शेवगाव येथील माळीवाड्यातील गायीवर तसेच  वरूर बु येथील  एका बैलावर उपचार सुरु आहेत. 

     पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.एकनाथ मुटकुळे आपल्या पथकासह तेथे तळ ठोकून आहेत .काल रविवारी सुट्टीचा दिवस असतानाही त्या पंचक्रोशीत  ६ हजार १४६ जनावरांचे लसीकरण करण्यात आले.

       लम्पी सदृश्य आजाराची लक्षणे आढळलेल्या जनावरांची संख्या जरी वाढत असली तरी प्रशासन सतर्क असल्याने  आतापर्यंत एक देखील जनावर दगावल्याची घटना घडलेली नाही. ही समाधानाची बाब असून उपचारानंतर पशुधन बरे होत असल्याने शेतकरी पशुपालकांनी घाबरून जावू नये. तालुका पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाशी वेळीच संपर्क साधावा. म्हणजे  बाधित जनावरांवर लगेच उपचार होऊ शकतील. असे अवाहन गटविकास अधिकारी डोके, – तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ.असलकर यांनी केले आहे.