कोपरगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा – माजी सभापती देवकर

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २० :  हवामान खात्याने सलग तीन दिवस अतिवृष्टीचा दिलेला अंदाज तंतोतंत खरा ठरला असून गेल्या दोन दिवसापासून संपूर्ण कोपरगाव तालुक्यात जोरदार ते अति जोरदार पावसाने सगळीकडे हाहाकार मांडला असून यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे यामुळे शिंदे- फडणवीस सरकारने संपूर्ण कोपरगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती तथा प्रगतशील शेतकरी सुनील देवकर यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकाद्वारे केली आहे.

या पत्रकात देवकर यांनी म्हटले आहे की, गेल्या महिन्याभरापासून संपूर्ण  कोपरगाव तालुक्यात सर्वत्र मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस चालू आहेत परंतु हवामान खात्याने सलग तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला होता तो तंतोतंत खरा ठरत कोपरगाव तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने जोरदार हजेरी लावल्याने खरा ठरला असून संपूर्ण तालुक्यातुन वाहणारे सर्व ओडे नाले तुडूंब भरून वाहू लागले आहे तर तालुक्यातील काही गावांचा काही काळासाठी संपर्क देखील तुटला होता. 

या जोरदार अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या जमिनीतून पाणी ओसंडून वाहत आहे यामुळे हाता तोंडाशी आलेली मका,सोयाबीन,कापूस, बाजरी आदि पिकांचा घास निसटल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे तर त्यात भर म्हणून की काय शेतकऱ्यांचा जोड धंदा म्हणून ज्याकडे पाहिले जाते तो दुग्ध व्यवसाय धंदा देखील जनावरांना आलेल्या लम्पि या संसर्गजन्य आजारामुळे अडचणीत सापडला आहे. त्यामुळे राज्य सरकारने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करत तत्काळ कोपरगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करत प्रत्येक शेतकऱ्याला तातडीची रोख स्वरूपात मदत देत दिलासा द्यावा.

तसेच ज्या शेतकऱ्यांनी शेतीचा विमा काढला आहे त्यांचा तो सरसकट मंजूर करावा किंवा ज्या शेतकऱ्याने अद्यापही विमा भरलेला नाही त्यांचा देखील सहानुभूतीपूर्वक विचार करत प्रत्येक शेतकऱ्यास मदत द्यावी अशी मागणी कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती सुनील देवकर यांनी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकाद्वारे केली आहे.