शेवगाव प्रतिनिधी, दि.२२ : आयुष्यात यशस्वी होण्यासाठी एक ध्येय ठरवुन त्यासाठी कठोर परिश्रम करा. स्पर्धात्मक परिस्थितीची जाणीव ठेवत आपल्या गुणवत्तेत वाढ करत ‘सारथी’ मार्फत राबविणाऱ्या योजनांचा लाभ घेऊन आपले भविष्य उज्वल करा असे आवाहन शेवगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी राजेश कदम यांनी केले.
मराठा समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक विकासासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव संस्था (सारथी) ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था कार्यरत असुन त्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविधांगी योजना व उपक्रमांचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी शेवगाव येथील रेसिडेन्सीअल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स मध्ये मंगळवारी आयोजित कार्यक्रमात गटविकास अधिकारी कदम बोलत होते.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ‘सारथी’चे अधि छात्रवृत्तीधारक संशोधक रामेश्वर तांबे, पंचायत समितीचे विषय तज्ञ टी. एस फापाळ, डी. डी. खडके, प्राचार्य बालाजी गायकवाड, मच्छिंद्र जायभाये, लक्ष्मण सोळसे, पर्यवेक्षिका छाया शिंगटे आदि उपस्थित होते.
‘सारथी’ संस्थेमार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहचविणे हा चावडी वाचन अभियानाचा मुख्य उद्देश असुन दूर्लक्षित समाजाच्या विकासासाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ घेऊन आपले भविष्य घडवावे असे आवाहन करत ‘मी सारथीचा लाभार्थी’ या सदराखाली अधि छात्रवृत्तीधारक संशोधक रामेश्वर तांबे यांनी सारथींच्या योजनांचा सविस्तर आढावा घेत विद्यार्थ्यांना माहिती दिली. याप्रसंगी सुमारे तीन हजार विद्यार्थी, शिक्षक, पालक उपस्थित होते. प्रा. आर. यु काळे यांनी सुत्रसंचलन करून आभार मानले.