प्रलंबित प्रश्न त्वरित मार्गी लावा, माजी आमदार कोल्हे यांची मुख्यमंत्री शिंदे यांचेकडे मागणी

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २३ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज बुधवारी (२३ नोव्हेंबर) शिर्डी दौऱ्यावर आले असता भाजपच्या प्रदेश सचिव तथा माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी कोल्हे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत कोपरगाव तालुक्यातील विविध विषयांवर चर्चा केली. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्यांकडून १०० टक्के नुकसान भरपाई देणे, नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गावर ड्रेनेजची व्यवस्था करणे आदींसह कोपरगाव तालुक्यातील पाणी, शेती, रस्ते आणि इतर प्रलंबित प्रश्न मुख्यमंत्र्यांकडे मांडून ते त्वरित सोडविण्याची मागणी कोल्हे यांनी केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दुपारी शिर्डी येथे भेट देऊन श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेऊन आरती केली. मुख्यमंत्र्यांसोबत त्यांच्या पत्नी लताताई शिंदे, राज्याचे महसूलमंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र पाटील, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आदी उपस्थित होते.

याप्रसंगी भाजपच्या प्रदेश सचिव तथा कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी कोपरगाव तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत चर्चा करून हे प्रलंबित प्रश्न सोडविण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी हे प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याची ग्वाही कोल्हे यांना दिली. सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांचे सर्व प्रश्न सोडवून त्यांना दिलासा देऊ, असे आश्वासन शिंदे यांनी दिले. 

यावर्षी अतिवृष्टीने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडले असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याआधीचे नियम-निकष बदलले आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ताबडतोब नुकसानभरपाई दिली. याबद्दल स्नेहलताताई कोल्हे यांनी शासनाचे अभिनंदन केले. यावर्षी पावसाळ्यात कोपरगाव विधानसभा मतदारसंघात प्रचंड पाऊस झाल्यामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत कोपरगाव तालुक्यातील सुमारे १३ हजार शेतकऱ्यांनी यावर्षी वेगवेगळ्या पिकांचा विमा उतरवून पीक विम्याचे हप्ते भरले. अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे १०० टक्के नुकसान झाले असताना शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी ५७ कोटी रुपये मिळायला हवे होते; परंतु पीक विमा कंपन्यांकडून कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना फक्त १ कोटी रुपये नुकसान भरपाई मिळाली आहे.

विविध पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना अत्यंत अल्प प्रमाणात नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. अनेक शेतकरी अजूनही पीक विम्याच्या लाभापासून वंचित आहेत. यामध्ये शासनाने हस्तक्षेप करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना संबंधित पीक विमा कंपन्यांकडून १०० टक्के नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी स्नेहलताताई कोल्हे यांनी केली.

स्नेहलताताई कोल्हे म्हणाल्या, नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गाचे कोपरगाव पंचक्रोशीतील दहा गावांच्या हददीतील काम अद्याप बाकी आहे. ड्रेनेजची व्यवस्था नसल्यामुळे समृध्दी महामार्गाच्या आसपासच्या शेतकऱ्यांचे यंदा खरीप हंगामात मोठे नुकसान झाले. कोकमठाण हददीत समृध्दी महामार्गावरील डक अंडरग्राउंड केलेला असून, त्याची उंची कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतमालाची ने-आण करण्यात अनेक अडचणी येत आहेत.

समृध्दी महामार्गावर ड्रेनेज व्यवस्था योग्य प्रकारे केलेली नाही. जे चर तयार केलेले आहेत ते अतिशय अरूंद असून, नळया टाकून पाणी जाण्याची केलेली व्यवस्था पूर्णत: कुचकामी ठरलेली आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये झालेल्या पावसाने शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचून काढणीस आलेली पिके शेतात सडून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे या चराचे रूंदीकरण करून नव्याने सी. डी. वर्क करण्यात यावे, जेणेकरून पावसाचे पाणी वाहून जाण्यास मदत होईल व त्याचा फटका शेतकऱ्यांना बसणार नाही.

समृध्दी महामार्गाच्या अपूर्ण कामामुळे कोकमठाणवासियांच्या अडचणीत भर पडली असून, शेतक-यांनाही मोठा फटका बसला आहे. कोकमठाण गावाच्या पाणीपुरवठा योजनेची मुख्य जलवाहिनी या कामात दबली गेली आहे. ती अन्यत्र हलवून हे काम वेळेत पूर्ण झाले नाही तर कोकमठाणवासियांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होईल. ही प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करावीत. समृध्दी महामार्गाच्या कामासाठी खडी व इतर साहित्याची ने-आण करणाऱ्या अवजड वाहनांमुळे कोपरगाव तालुक्यातील अनेक रस्ते अत्यंत खराब झालेले आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून, हे सर्व रस्ते समृध्दी महामार्ग व्यवस्थापनाने अगर ठेकेदारामार्फत तातडीने दुरुस्त करण्याबाबत संबंधितांना निर्देश द्यावेत, अशीही मागणी स्नेहलताताई कोल्हे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.