जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी १.२० कोटी निधी मंजूर – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २५ : कोपरगाव मतदारसंघातील काही गावातील जिल्हा परिषद शाळांच्या खोल्यांची दुर्दशा झाल्याने त्याठिकाणी नवीन वर्गखोल्या बांधणे गरजेचे असल्यामुळे त्याबाबत प्रस्ताव सादर केला होता. त्याबाबत महायुती शासनाने केलेल्या पाठपुराव्याची दखल घेवून मतदार संघातील १० शाळा खोल्यांच्या बांधकामासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून १.२० कोटी निधी मंजूर केला असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.  

कोपरगाव मतदार संघातील जिल्हा परिषद शाळेच्या अनेक वर्गखोल्या धोकादायक झाल्यामुळे विद्यार्थ्यांना व शिक्षकांना जीव मुठीत धरून शिक्षण घ्यावे लागत होते. ज्याप्रमाणे खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांना सोयी सुविधा मिळतात त्याप्रमाणे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना देखील भौतिक सुविधा मिळाव्यात व त्यांची शैक्षणिक प्रगती होण्यासाठी जिल्हा परिषद शाळा खोल्यांचे बांधकाम करणे गरजेचे होते.

या जिल्हा परिषद शाळा खोल्या बांधकामासाठी निधी मिळावा यासाठी पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्यातून कोळपेवाडी जिल्हा परिषद शाळा मराठी –०२, कोळपेवाडी जिल्हा परिषद शाळा उर्दू- ०१, मोर्वीस जिल्हा परिषद शाळा -०३, तिळवणी जिल्हा परिषद शाळा -०२, माहेगाव देशमुख जिल्हा परिषद शाळा -०२ अशा एकूण १० शाळा खोल्यांना प्रत्येकी १२ लक्ष याप्रमाणे १.२० कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे.

या निधीतून जीर्ण झालेल्या जिल्हा परिषद शाळा खोल्यांच्या जागी नवीन इमारती उभ्या राहून या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचा कायपालट होणार आहे. विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे ज्ञानाचे धडे गिरवीता येणार आहे. त्यामुळे कोळपेवाडी, मोर्विस, तिळवणी, माहेगाव देशमुख या गावातील ग्रामस्थ, पालक, शिक्षकांनी समाधान व्यक्त केले असून आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.

जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीसाठी निधी मंजूर केल्याबदल आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, पालकमंत्री तथा महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे यांचे आभार मानले असून उर्वरित आवश्यक असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळा खोल्यांना निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले आहे.