ढाकणेच्या जनसंवाद यात्रेतील विसंवाद

शेवगाव प्रतिनिधी, दि. ११ :  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विधिज्ञ प्रताप ढाकणे यांनी शेवगाव मतदार संघात जनसंवाद यात्रेला सुरुवात केली आहे. मतदारसंघातील शेवगाव व पाथर्डी या दोन्ही तालुक्यात पक्ष संघटना मजबूत करणे हे या यात्रेचे उद्दिष्ट असले तरी ही जनसंवाद यात्रा मोठ्या स्वरूपात विसंवादाच्या भोवऱ्यात अडकल्याचे जाणवत आहे.

पक्षाचे प्रांतिकचे नेते असलेल्या अँड. प्रताप ढाकणे यांच्या येथील  संवाद  यात्रेकडे  शेवगाव तालुक्यातील पदाधिकारी व नेत्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. त्यावरून हे स्पष्ट होते. आगामी काळात सन २०२४  च्या विधानसभा निवडणुकीची दावेदारी या मागचे कारण असू शकते.

मागील २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी पक्षाने अॅड. ढाकणे यांना उमेदवारी देऊन संधी दिली होती. थोड्याशा फरकाने त्यांच्या यशाने त्यांना हुलकावणी दिली. त्यामुळे पक्षश्रेष्ठीच्या परवानगीने किंवा त्यांनी दिलेल्या  संकेतानुसारच शेवगाव मतदार संघात जनसंवाद यात्रा काढून  २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी आपला दावा ते करत आहेत.

ही गोष्ट शेवगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना, विशेषतः घुले समर्थकांना रुचली नसावी. म्हणूनच अनेक घुले समर्थक याबाबत स्पष्ट नाराजी व्यक्त करत आहेत. अँड. ढाकणे यांच्या संवाद यात्रेनंतर घुलेंचाही स्वतंत्र दौरा निघू शकतो, तशा  त्यांच्या कार्यकर्त्यांच्या हालचाली  देखील आहेत.

शेवगाव मतदार संघाचे आमदार भारतीय जनता पार्टीचे असले तरी तालुक्यातील बहुतांशी सहकारी संस्था व ग्रामपंचायती घुले बंधूचे नेतृत्व मानणाऱ्या आहेत. त्यामुळे परिसरात राष्ट्रवादीचे कोणतेही कार्यक्रम घुलेंना  डावलून यशस्वी होऊ शकणार नाहीत. या समीकरणाचे ढाकणेंना इतक्या वर्षे घुलेंसोबत राहून देखील आकलन झाले नाही . असे म्हणता येणार नाही. म्हणूनच यामागचे वेगळे इंगीत असू शकते.

या संदर्भात प्रदेश पातळी वरून स्थानिक नेतृत्वाला बाजूला ठेवण्याचा सल्ला दिला गेलाय की तालुक्यातील दुसरी एखादी ‘ शक्ती’ सोबतीला घेऊन अॅड  ढाकणे यांचा नवा इतिहास घडवायचा मनसुबा आहे, असा संशय घेतला तर ते वावगे ठरू नये.