मंदीराच्या नावाखाली चुकीची दुकानदारी करणाऱ्यांची उडाली झोप
कोपरगाव प्रतिनिधी दि.२९ : संपूर्ण राज्यात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटावून कामचुकारांची झोप उडवणारे व नियमाला धरुन काम करणारे प्रामाणिक अधिकारी म्हणून ज्यांची ख्याती आहे, असे बेधडक अधिकारी तुकाराम मुंडे यांची नुकतीच शिर्डी साईबाबा संस्थानच्या कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आल्याने शिर्डी साईबाबा संस्थानच्या मंदीर प्रशासनातील कर्मचाऱ्यासह मंदीराच्या नावाखाली चुकीची दुकानदारी करणाऱ्यांची झोप उडाली आहे. राज्यातील विविध भागातील विविध विभागात धडाकेबाज काम करून शिस्तबद्ध नियोजन करणारे अधिकारी तुकाराम मुंडे यांची शिर्डी येथे नियुक्ती झाल्याने कही खुशी कही गम अशी अवस्था झाली आहे.
प्रशासकीय सेवेचा दांडगा अनुभव असलेले राज्याच्या आरोग्य विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची मंगळवारी शिर्डी देवस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश राज्य सरकारने दिले असून शिर्डीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी असलेल्या भाग्यश्री बानायत यांची नागपूर या ठिकाणी बदली करण्यात आली आहे.
भाग्यश्री बानायत यांनी शिर्डी देवस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाल्या नंतर गेल्या दीड वर्षांमध्ये त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले होते. काही ठिकाणी ग्रामस्थ व प्रशासन यांच्यामध्ये दरी निर्माण झालेली होती, त्यामध्ये मार्ग काढून शिर्डी देवस्थानचा कारभार कशा पद्धतीने चांगल्या करता येईल या दृष्टिकोनातून त्यांनी सातत्याने प्रयत्न केला. देवस्थानामधली प्रशासकीय शिस्तही त्यांनी चांगल्या पद्धतीने लावली होती. त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला होता.
दरम्यान दुसरीकडे राज्यामध्ये गेल्या महिन्याभरामध्ये आरोग्य विभागाच्या माध्यमातून कडक शिस्तीचे ओळखले जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी धडक कारवाई मोहीम राज्यभरामध्ये आरोग्य विभागात सुरू केली होती. संपूर्ण आरोग्य यंञणा मुंडे यांच्यामुळे सलाईनवर होती. आरोग्य विभागात तुकाराम मुंडेची बदली दुसरीकडे व्हावी म्हणून आरोग्य विभागातील कर्मचारी देव पाण्यात ठेवून बसले होते. अखेर चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबा प्रसन्न झाल्याची भावना व्यक्त करत काहींनी चक्क खोबरं भंडारा उधळला.
अनेकांनी आपल्या आरोग्य सेवेच्या कामात बदल करुन घेतला होता. आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची मरगळ झटकण्याचे काम मुंडेंनी केले होते. तुकाराम मुंडे यांची अचानकपणे शिर्डी देवस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली. त्याबाबतचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत, तर दुसरीकडे भाग्यश्री बानायत यांची विदर्भ स्टॅच्युटरी डेव्हलपमेंट बोर्ड यांच्या सेक्रेटरीपदी निवड झाली आहे. बानायत यांच्या बदली पेक्षा तुकाराम मुंडे यांच्या बदलीची चर्चा देशभर जोरदार सुरु आहे.
सर्वसामान्य साईभक्त तुकाराम मुंडे यांच्या बदलीमुळे आनंदी झाले आहेत. साईबाबांच्या पविञ नगरीतील जठील समस्या अनेक वर्षांपासून सुटत नव्हत्या. साईबाबांच्या नावाने होणारे घोटाळे, बोगस दर्शन पास, दर्शनाच्या नावाखाली भक्तांची होणारी आर्थिक लुट आता पुर्णपणे थांबण्याची आशा साईभक्त व्यक्त करीत आहेत. तुकाराम मुंडे यांच्या नियुक्तीमुळे साईबाबा संस्थानचे कोमात गेलेले सुपर हाॅस्पिटल आता जोमात येईल का? सर्वसामान्य रुग्णांना मोठमोठ्या शस्त्रक्रिया तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पुन्हा प्रभावशाली होतील का? शिर्डी व पंचक्रोशीतील गावखेड्यांच्या विकासाला चालना मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
शिर्डीच्या ग्रामस्तांच्या व्यथा समजून घेवून शिर्डीची बाजारपेठ फुलवण्यासाठी तुकाराम मुंडे कसे सहकार्य करतात याकडे लक्ष लागले आहे. शिर्डीला तुकाराम मुंडे येणार हि माहीती राज्यभर वाऱ्यासारखी पसरल्याने राज्यातील अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या जरी झाल्या तरी तुकाराम मुंडे यांच्या बदलीची चर्चा राज्यात सुरु आहे.