वृंदावन नगर व सावित्रीबाई फुले नगरला भूमिगत गटार, रस्ते सुविधा द्या – राष्ट्रवादीची मागणी

कोपरगाव प्रतीनिधी, दि. २९ : कोपरगाव शहरातील वृंदावननगर व सावित्रीबाई फुलेनगर परिसरात भूमिगत गटारी व रस्ते सुविधा नसल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून नागरिकांना होत असलेल्या त्रासाची दखल घेवून तातडीने भूमिगत गटार व रस्ते सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी शांतारामजी गोसावी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, कोपरगाव नगरपालिका हद्दीत येणाऱ्या वृंदावन नगर (शिंदे रोड ते खडकी रोड) व सावित्रीबाई फुलेनगर (निकम घर ते महाजन घर) या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरी वसाहत आहे. मात्र या ठिकाणच्या नागरिकांना आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा कोपरगाव नगरपालिकेकडून मिळत नाहीत.

या परिसरातील रस्त्यांची अत्यंत वाईट अवस्था झाली असून भूमिगत गटारी नसल्यामुळे सर्वत्र सांडपाणी साचून सर्वत्र डासांचे साम्राज्य निर्माण होवून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेवून वृंदावन नगर व सावित्रीबाई फुले नगरमध्ये भूमिगत गटार व रस्ते सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसकडून या निवेदनातून करण्यात आली आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा सचिव सौ. रेखा जगताप, शैलेश साबळे, किरण बागुल, तन्मय साबळे, जयश्री कुदळे, मनिषा कदम, संगीता खोपकर, कविता महाले, मीना साबळे, वनिता काळे, उज्वला पवार, सुनीता मिश्रा, अनिता गायकवाड, माधुरी क्षीरसागर, हर्षदा वळवी, सावित्री पावले, मीना गायकवाड, आशा पवार, मिनाक्षी गिते, मनीषा पाटोळे, प्रतिभा खैरनार, पुष्पा लाड, मिना गिरमे, सुमन वराडे, अलका लाड आदी उपस्थित होते.