संजीवनी क्रीडा क्षेत्रात अव्वल
कोपरगांव प्रतिनिधी, दि. २३ : इंटर इंजिनिअरींग डीप्लोमा स्टुडंटस् स्पोर्टस असोसिएशन (आयईडीएसएसए), महाराष्ट्र राज्याच्या वतीने संजीवनी के. बी. पी. पाॅलीटेक्निकच्या भव्य मैदानावर डब्ल्यु ५ झोन अंतर्गत मुलींच्या विविध हिवाळी क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. यात सर्वात जास्त विजेते-उपविजेते पदे, सर्व क्रीडा प्रकारातील सहभाग या निकषांवर आयईडीएसएसएने संजीवनी पाॅलीटेक्निकला जनरल चॅम्पियनशिप बहाल केले आहे, या उपलब्धीने संजीवनी पाॅलीटेक्निकने परंपरेनुसार एक नवीन किर्तीमान स्थापित केला आहे, अशी माहिती पाॅलीटेक्निकने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात पुढे म्हटले आहे की, डब्ल्यु ५ झोन अंतर्गत अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक, धुळे, जळगांव आणि नंदुरबार या सहा जिल्ह्यातील सर्व पाॅलीटेक्निकचा समावेश आहे. या भव्य क्रीडा स्पर्धांमध्ये सहा जिल्ह्यातील सहभागी ३८ पाॅलीटेक्निकच्या ८५० मुलींनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये सहभाग नोंदविला. यात कबड्डी, खो-खो, व्हाॅलीबाॅल, बास्केटबाॅल, चेस, कॅरम, बॅडमिंटन, रनिंग (१००, २००, ४०० आणि ८०० मीटर), १०० मी बाय ४ रिले, जावेलिन थ्रो, डिस्क थ्रो, लाॅंन्ग जम्प, ट्रिपल जम्प व शॉट पुट अशा एकुण १८ क्रीडा प्रकारांचा समावेश होता.
आपापल्या विद्या शाखेनिहाय आधुनिक ज्ञान देण्याबरोबरच विध्यार्थ्यांमधील दडलेले गुण हेरून त्यांना विकसीत करण्यासाठी संजीवनी पाॅलीटेक्निकमध्ये राष्ट्रीय निपुणता प्राप्त प्रशिक्षकांची नेमणुक केलेली असल्यामुळे संजीवनी पाॅलीटेक्निक मधुन बहुआयामी विध्यार्थी घडत असुन संजीवनीचे विध्यार्थी प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे. माजी मंत्री व संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक कै. शंकरराव कोल्हे यांनी ४० वर्षांपूर्वी ग्रामिण भागातील मुलां-मुलींसाठी पाहीलेले प्रगतीचे स्वप्न सत्यात उतरत असुन यात ग्रामिण भागातील मुलींची संख्या उल्लेखनिय आहे.
यापुर्वी काही मुलींनी विभागीय अथवा राज्य पातळीवर क्रीडा क्षेत्रात मिळालेल्या यशाच्या जोरावर सरकारी नोकऱ्या प्राप्त केल्या आहेत, ही संजीवनीच्या दृष्टीने मोठी उपलब्धी आहे. संजीवनी मध्ये शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक, प्रयोगशिलता, आधुनिक अद्ययावत ज्ञान, विविध स्पर्धांमधिल विध्यार्थ्यांचा सहभाग, इत्यादी बाबींवर विशेष भर देण्यात येवुन भारताचे सक्षम, संपन्न, सजग आणि सतर्क नागरीक घडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येतात. सहा जिल्ह्यातून ग्रामिण भागातील संजीवनी पाॅलीटेक्निकला जनरल चॅम्पियनशिप मिळणे ही बाब सर्व प्रकारच्या प्रयत्नांची पुष्टी आहे. – अमित कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, विश्वस्त सुमित कोल्हे यांनी विविध क्रीडा प्रकारातील सर्व विजयी व सहभागी खेळाडू विध्यार्थींनी, प्राचार्य ए. आर. मिरीकर, स्पर्धांच्या समन्वयक प्रा. मोहिनी गुंजाळ, सर्व विभाग प्रमुख, सर्व क्रीडा शिक्षक गणेश नरोडे, शिवराज पाळणे, परीमल कचरे, अक्षय येवले व करण भांभू यांचे अभिंनदन केले आहे.