कोपरगाव प्रतिनिधी, दि. १३ : तालुक्यातील कोपरगाव तळेगाव मार्गे वडगावपान रस्ता अगोदरच उध्वस्त होऊन खड्डे पडून अडचणीचा झाला आहे. त्यातूनच या मार्गावर नगर मनमाड मार्गावरील अवजड वाहतूक वळविण्यास शिवसेनेचे नितीन औताडे यांनी हरकत घेतली आहे. तसे पत्र जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना देण्यात आले आहे.
पत्रात औताडे यांनी म्हटले, सदर अवजड वाहतूक वरील पर्यायी मार्गावरून वळविण्याबाबत जाहीर प्रगटन काढण्यात आले आहे .मात्र कोपरगाव ,झगडे फाटा ते वडगाव पान हा रस्ता आधीच अत्यंत खराब झालेला असून मोठे खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांमुळे दररोज अपघात घडत आहे. सदर रस्त्याची वाहतूक क्षमता 13240 मॅट्रिक टन प्रतिदिन आहे. अहमदनगर मनमाड राष्ट्रीय महामार्ग वरील रस्त्याची अवजड वाहतूक क्षमता 12500 मॅट्रिक टन पेक्षा जास्त आहे.
सदरची वाहतूक कोपरगाव ते वडगाव पान या रस्त्यावरून वळविल्यास सदर रस्त्याचे मोठे नुकसान होईल. सद्यस्थितीत या रस्त्याची दुरुस्तीची मागणी होत असताना त्यास निधी मिळू शकलेला नाही. या रस्त्यावरून वाहतूक वळविल्यास 35 किलोमीटर अंतर वाढणार असून त्यातून इंधन खर्चात देखील वाढ होणार आहे आणि ही राष्ट्रीय संपत्तीचे मोठे नुकसान आहे.
कोपरगाव ते वडगाव पान हा रस्ता राज्यमार्ग असल्याने या रस्त्याच्या दुरुस्ती करता भविष्यात मिळणारा निधी रस्त्याच्या वाहतूक क्षमतेनुसारच मिळणारा आहे. मात्र अवजड वाहतूक या मार्गे वळविल्याने या रस्त्याच्या नुकसानीबाबत शासन स्तरावर कुठलाही विचार विनिमय होणार नाही. त्यामुळेच आधीच या रस्त्याची दयनीय अवस्था झालेली असताना या बाबीचा विचार करून नगर मनमाड महामार्गावरील वाहतुकीस या मार्गावरून वळविण्यात येऊ नये अशी माझी व परिसरातील नागरिकांच्या वतीने हरकत आहे असेही शेवटी औताडे यांनी म्हटले आहे.