अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई द्या – विवेक कोल्हे 

सरसकट सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम देण्याची मागणी 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १९ : कोपरगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिप पिके भुईसपाट होऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना दिवाळी सणापूर्वी शासनाने जाहीर केलेले अनुदान वाटप करावे. तसेच विमा कवच घेतलेल्या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट पीक विम्याची रक्कम दिवाळीच्या आत देण्यात यावी, अशी मागणी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केली आहे.

यंदा पावसाळा सुरू झाल्यापासून मागील तीन महिन्यांत कोपरगाव तालुक्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झालेला आहे. कोपरगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आता परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. पावसाने शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्यामुळे सततच्या पावसाला शेतकरीही आता कंटाळले आहेत.

           अतिवृष्टीमुळे सोयाबीन, बाजरी, कापूस, मिरची, भाजीपाला, फळपिके व इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शेतकऱ्यांनी पीककर्ज काढून पिकांची लागवड केली. अंतर मशागत, खते, कीटकनाशके यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला. नेमके उत्पन्न हातात येण्याच्या वेळी पावसाने सतत झोड उठवली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.   

             पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने अनुदान देण्याचा निर्णय यापूर्वीच घेतलेला आहे. ते अनुदान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित वाटप करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यानुसार जिल्हा व तालुका प्रशासनाने योग्य ती कार्यवाही तातडीने करून शेतकऱ्यांना विनाविलंब दिवाळीपूर्वी आर्थिक मदत देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी विवेक कोल्हे यांनी केली आहे. 

         विवेक कोल्हे यांनी म्हटले आहे की, मुसळधार पावसामुळे कोपरगाव तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये खरिपाची पिके भुईसपाट होऊन शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून गेला आहे. त्यामुळे शेतीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची? दिवाळी सण कसा साजरा करायचा? रब्बी हंगामाची पूर्वतयारी कशी करायची? कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा? अशा अनेक प्रश्नांमुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. 

             महापूर, चक्रीवादळ, गारपीट, अतिवृष्टी आदी नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान पीक विमा योजना (पीएमएफबीवाय) सुरू केलेली आहे. यावर्षी कोपरगाव तालुक्यातील १३ हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील वेगवेगळ्या पिकांचा विमा उतरवून विम्याची रक्कम विमा कंपनीकडे भरलेली आहे. 

            अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे जे नुकसान झाले आहे त्याचे महसूल व कृषी खात्यामार्फत पंचनामे करण्यात आले आहेत. बहुतांश शेतकऱ्यांनी आपल्या पीक नुकसानीची माहिती विमा कंपनीकडे सादर केलेली आहे; परंतु अनेक शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणीमुळे ऑनलाईन पद्धतीने विमा कंपनीला मुदतीच्या आत आपल्या नुकसानीची माहिती देता आली नाही. त्यामुळे संबंधित विमा कंपनीने महसूल व कृषी विभागाने पीक नुकसानीचे केलेले सर्व पंचनामे गृहित धरून सरसकट सर्वच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम दिवाळीच्या आत द्यावी, असे कोल्हे यांनी म्हटले आहे.

               नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी हताश न होता धीर धरावा. केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शासनाच्या आदेशानुसार प्रशासनाने अतिवृष्टीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे तातडीने पूर्ण करावेत. बहुतेक भागात अद्यापपर्यंत पंचनामे झालेले नाहीत. त्यामुळे अनेक शेतकरी अतिवृष्टीच्या अनुदानाच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे म्हणून महसूल व कृषी विभागाने एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्याअभावी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. त्याचबरोबर आणेवारी लावताना शासनाचे निकष व सत्य परिस्थिती पाहून आणेवारी जाहीर करावी, अशी मागणी विवेक कोल्हे यांनी केली आहे.