कोपरगाव प्रतिनिधी, दि. १९ : विद्यार्थी ज्या शाळेत शिकतो त्या शाळेचा केंद्रबिंदू असतो. त्या शाळेतून त्याला मिळणारे शिक्षण, संस्कार हे त्याच्या उज्वल भविष्याची ओळख असते. उत्कृष्ट शिक्षण पद्धती आणि संस्कारामुळे विद्यार्थ्यांमधील कला गुण विकसित होत असतात त्याचाच प्रत्यय म्हणजे समता स्कूल विद्यार्थ्यांसाठी घेत असलेले विविध उपक्रम होय. या विविध उपक्रमांच्या माध्यमातून समता स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतोच, त्याच बरोबर समाजामध्ये त्या कलागुणांचा वापर कसा करायचा याचे मार्गदर्शन देखील समतातून मिळत आहे.
या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना चांगली दिशा आणि समाजाभिमुख कार्य करण्याची ही सवय लागते. त्यामुळे समता इंटरनॅशनल स्कूलचा हा उपक्रम कौतुकास्पद असून यातून मोठ – मोठे कलाकार, शिल्पकार घडणार आहे. असे प्रतिपादन कोपरगाव शहरातील सुप्रसिद्ध डॉ.दत्तात्रय मुळे यांनी केले. समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या आर्ट वोल्कॅनो प्रदर्शन व विक्री शहरातील कलश मंगल कार्यालयात १५ ऑक्टोबर २०२२ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. त्या प्रसंगी ते बोलत होते.
समता इंटरनॅशनल स्कूल नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देते. समता स्कूलने विद्यार्थ्यांमध्ये विविध कला – गुण आणि मुल्यांचा विकास होण्याची संधी या उपक्रमाच्या अंतर्गत निर्माण करून दिली आहे. या प्रदर्शनातून मिळणारी सर्व रक्कम शिर्डी येथील साई अनाथालयाला दीपावली गोड करण्यासाठी देणार असल्याची माहिती समता इंटरनॅशनल स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ.स्वाती कोयटे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना दिली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.दत्तात्रय मुळे आणि सौ.मुळे या होत्या तर डॉ.राजेश श्रीमाळी, डॉ.रामदास आव्हाड , पत्रकार सतीश वैजापूरकर , समता महिला बचत गटाचे अध्यक्षा सौ.सुहासिनी कोयटे यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रमुख पाहुणे दत्तात्रय मुळे व सौ. मुळे यांच्या हस्ते फीत कापून आणि दीपप्रज्वलन करत प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. समता इंटरनॅशनल स्कूलचे मुख्य कार्यवाह संदीप कोयटे आणि कार्यकारी विश्वस्त सौ.स्वाती कोयटे यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
प्रमुख उपस्थितांनी मनोगत व्यक्त करत ‘हा कार्यक्रम केवळ एक प्रदर्शन नसून एक सृजनात्मक उत्सव आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समता स्कूल नेहमी संधी उपलब्ध करून देते व समता स्कूलचे शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत असल्याचे सांगितले.
विद्यार्थ्यांनी बनवलेल्या वेगवेगळ्या वस्तूंची माहिती शिक्षिका सौ.सारिका अग्रवाल यांनी उपस्थितांना करून दिली. प्रदर्शनातील प्रत्येक स्टॉलला विद्यार्थ्यांचे पालक आणि उपस्थित कोपरगावकर यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले. विद्यार्थ्यांनी बनविलेल्या विविध वस्तू खरेदी केल्या.यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सजावटीच्या उपयुक्त अशा विविध वस्तू प्रदर्शित करण्यात आल्या होत्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्कूलच्या इ.१० तील विद्यार्थिनी दिवा सांड व स्वरूपा दास यांनी केले. प्रदर्शन यशस्वीतेसाठी समता इंटरनॅशनल स्कूलचे कला विभागाच्या प्रमुख विभावरी नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचे पालक व कोपरगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उपस्थितांचे आभार उप प्राचार्य समीर अत्तार यांनी मानले.