कोपरगाव प्रतिनिधी, दि. २४ : दीड महिना पावसाचा खंड पडल्यामुळे चालू वर्षाचा गळीत हंगाम मोठा आव्हानात्मक आहे. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत गळीत हंगाम पार पाडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचे पैसे अदा करावे लागणार आहे. दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे ऊस कमी प्रमाणात उपलब्ध असून ऊस मिळविण्याची स्पर्धा साखर कारखान्यांना करावी लागणार असून पहिला हप्ता चांगला द्यावा लागणार आहे. त्या दृष्टीने स्थानिक बाजारपेठेतील साखरेचा दर विचारात घेवून जिल्हा बँकांकडून अपेक्षित उचल मिळणे आवश्यक आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पहिली उचल कारखाने चांगल्या पद्धतीने देवू शकणार आहे. साखर तारण मर्यादा वाढविल्यास समतोल राखला जावून कारखान्यांच्या अडचणी दूर होतील. साखर तारण मर्यादा वाढविल्यास ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेत पेमेंट अदा करण्यात मदत होईल त्यासाठी जिल्हा बँकांनी साखर तारण मर्यादा वाढवावी अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी केली आहे.
चालू वर्षी दीड महिना पावसाचा खंड पडल्यामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून रब्बी हंगामाचे भवितव्य देखील अधांतरी आहे. धरणे भरलेली असून साठवण बंधारे देखील भरलेली आहेत हि समाधानाची बाब आहे. मेंढेगिरी समितीच्या चुकीच्या निर्णयामुळे आजपर्यंत अन्याय होत आला आहे. जायकवाडी धरणात पुरेसे पाणी आहे. त्यामुळे यावर्षी दुष्काळी परिस्थिती असतांना जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय घेवू नये याबाबत पाठपुरावा सुरु असून त्याबाबत न्यायालयात देखील याचिका दाखल केलेली आहे. दुष्काळी परिस्थिती पाहता शेतकऱ्यांना रब्बी हंगामाचे नियोजन करण्यासाठी तातडीने कालवा सल्लागार समितीची बैठक घ्यावी याबाबत पालक मंत्री व जलसंपदा मंत्री यांच्याकडे मागणी करू.- आमदार काळे.
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२३ – २४ या वर्षाच्या ६९ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ विजयादशमीच्या मुहूर्तावर कारखान्याचे संचालक सूर्यभान कोळपे व त्यांच्या सुविद्य पत्नी चंद्रकला कोळपे यांच्या हस्ते विधिवत पूजन करून ज्येष्ठ संचालक व मार्गदर्शक माजी आमदार अशोक काळे यांच्या अध्यक्षतेखाली कारखान्याचे चेअरमन आमदार काळे व संचालक मंडळाच्या हस्ते गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून करण्यात आला याप्रसंगी आमदार काळे बोलत होते.
यावेळी बोलतांना आमदार काळे म्हणाले की, साखर आयुक्तालयाचे अंदाजा नुसार १४.०७ लाख हेक्टर क्षेत्र ऊस गाळपासाठी उपलब्ध होणार असून त्यातून ८८.५८ लाख साखर उत्पादन होईल असा अंदाज असून या व्यतिरिक्त १५ लाख मे. टन साखरेचा इथेनॉल निर्मिती करीता वापर होणार आहे. मागील हंगामात राज्यामध्ये १०५ लाख मे. टन साखर उत्पादन झाले होते. त्यापूर्वी २०२१-२२ मध्ये १३७ लाख मे. टन साखर उत्पादन महाराष्ट्रात झालेले असून मागील वर्षाच्या तुलनेत १५ ते १७ लाख मे. टन व २०२१-२२ चे तुलनेमध्ये जवळपास ४५ ते ५० लाख मे. टन साखर उत्पादन कमी होणार आहे. चालू वर्षाचा गाळप हंगाम हा कमी दिवसांचा अडचणींचा आहे. एकूण ६ लाख मे. टन गाळपाचे उदिष्ट ठरविलेले असल्याचे सांगितले.
केंद्र शासनाने आयकराचा प्रश्न मार्गी लावला असून भविष्यात देखील साखर कारखानदारीच्या बळकटीकरणासाठी त्यांनी सहकार्य करावे. स्पिरीटवर मद्यासाठी जीएसटी ऐवजी व्हॅट आकारला जावा असा महत्वपूर्ण निर्णय जीएसटी कौन्सिल समितीने घेतल्यामुळे मोठा दिलासा मिळाला असून त्याबाबत देखील आमदार काळे यांनी केंद्र सरकारचे यावेळी आभार मानले. गळीत हंगाम शुभारंभ व शेतकरी मेळाव्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार होते. परंतु हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्यामुळे वेळेत दुसरे हेलिकॉप्टर उपलब्ध होवू शकले नाही. पुढील नियोजित कार्यक्रम असल्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाही. परंतु पुढील वेळी त्यांना आणून त्यांच्याकडे आपल्या समस्या मांडनार व मार्गी लावणार असल्याचे आमदार काळे यांनी सांगितले.
कारखाना विस्तारीकरण व आधुनिकीकरणाचे दुसऱ्या टप्प्यातील सर्व कामे येत्या काही दिवसात पूर्ण होवून १ नोव्हेंबर पासून पूर्ण क्षमतेने सहा हजार मे. टन क्षमतेने चालणार आहे. त्यामुळे कारखान्यासाठी जास्तीत जास्त ऊस उपलब्ध होवून इतर कारखान्यांच्या तुलनेत आपला कारखाना जास्त दिवस सुरु राहील यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. कर्मवीर शंकरराव काळे यांच्या विचारांवर व माजी आमदार अशोक काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा हंगाम यशस्वीपणे पार पाडणार असल्याचे आमदार काळे यांनी सांगितले.
याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ. मच्छिंद्र बर्डे, सर्व संचालक मंडळ, तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते कारभारी आगवण, बाळासाहेब कदम, एम.टी. रोहमारे, नारायण मांजरे, काका जावळे, ज्ञानदेव मांजरे, चंद्रशेखर कुलकणी, बाबासाहेब कोते, मुरलीधर थोरात, संभाजी काळे, गौतम बँकेचे चेअरमन सुधाकर दंडवते, पद्मविभूषण शरदचंद्र पवार, पतसंस्थेचे चेअरमन देवेंद्र रोहमारे, गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे कार्यकारी संचालक दौलत मोरे, गौतम केनचे कार्यकारी संचालक सुभाष गवळी, राजेंद्र जाधव, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माधव खिलारी, शहराध्यक्ष सुनिल गंगुले, युवक अध्यक्ष चारुदत्त सिनगर, कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक सुनिल कोल्हे,
आसवनी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, सेक्रेटरी बाबा सय्यद, असि. सेक्रेटरी संदीप शिरसाठ, चीफ इंजिनिअर निवृत्ती गांगुर्डे, चिफ केमिस्ट सुर्यकांत ताकवणे, फायनान्स मॅनेजर सोमनाथ बोरनारे, शेतकी अधिकारी कैलास कापसे, उद्योग समुहातील सर्व संलग्न संस्थांचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सर्व माजी सदस्य, कोपरगाव नगरपरिषदेचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांसह सभासद, शेतकरी, कामगार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी संचालक अरुण चंद्रे यांनी केले तर आभार उपाध्यक्ष डॉ. मच्छिंद्र बर्डे यांनी उपस्थितांचे आभार मानले.