कोपरगाव प्रतिनिधी, दि. २५ : कोपरगाव विधानसभा मतदार संघातील पारंपरिक विरोधक असलेले काळे-कोल्हे आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी एकञ प्रचार करून आपला अंतर्गत विरोध बाजुला ठेवून एक दिलाने, एक विचाराने प्रचार यंञणेत सामील होतील का? एकाच विचार मंचावर बसुन विकासाची कहाणी सांगतील का? आमच्या उमेदवाराला निवडून द्या म्हणुन हातात हात घालुन मतदारांना विनवणी करतील का?
महायुतीचा धर्म पाळण्यासाठी वरिष्ठ नेत्यांच्या आदेशाचे पालन म्हणून आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी काळे-कोल्हे एकाच विचार धारेने चालले तर कोपरगाव तालुक्यात किमान लोकसभा निवडणुकी पुरते तरी सक्षम विरोधक राहीलेला नाही हेच नक्कीच.
कोपरगाव तालुक्यात लोकसभेची निवडणुक एकतर्फी होण्याची आशा आहे. कारण आमदार आशुतोष काळे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या बाजूने तर माजी आमदार स्नेहलता कोल्हे, कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन हे भाजपचे कट्टर आहेत. दोघेही महायुतीमध्ये असल्याने तालुक्यातील पारंपरिक विरोधक असलेले काळे-कोल्हे आज तरी एकाच विचार धारेवर राजकीय एकञ आहेत. दोघांनाही नरेंद्र मोदींचे तसेच महायुतीच्या उमेदवराचे कौतुक करावे लागणार आहे. काळे-कोल्हे यांच्या नंतर महानंद दूध संघाचे माजी अध्यक्ष व गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजणे व शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख नितीन औताडे यांच्या गटाची ताकत तालुक्यात बऱ्यापैकी आहे.
परंतू परजणे हे भाजपचे तर औताडे शिवसेनेचे असल्याने त्यांनाही महायुतीचा धर्म पाळावा लागणार आहे. तालुक्यातील दिग्गज नेते व कार्यकर्ते पदाधिकारी हे जवळपास महायुतीशी निगडीत आहेत. फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा एक गट महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी प्रचार यंञणा राबवणार असले तरी त्यांची ताकत तुलनेने कमीच वाटते. त्यामुळे कोपरगाव तालुक्यात सध्या तरी महायुतीच्या उमेदवारासाठी ताकतअधिक दिसत असली तरी काळे-कोल्हे यांच्या भूमिकेवर बरंच काही अवलंबून आहे.
विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांचा चेहरा बऱ्याच लोकांना माहीत नसताना माजी आमदार अशोकराव काळे यांनी लोखंडे यांना केवळ १५ दिवसात निवडणुकीच्या रिंगणात उभे करुन माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा पराभव करीत लोखंडे यांना पहील्यावेळेला खासदार केले. लोखंडे यांना खासदार करण्यात माजी आमदार अशोकराव काळे यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांनतर लोखंडे यांनी काळे यांच्यापासून दूर गेले दुसऱ्यांदा काळे विरोधी पक्षात गेल्याने माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी लोखंडे यांच्यासाठी आपली ताकत लावली आणि लोखंडे यांना दुसऱ्यांदा सर्वाधिक मताधिक्याने खासदार करण्यात कोल्हे यांचे योगदान मोलाचे ठरले. आता तर काळे व कोल्हे महायुतीमध्ये असल्याने महायुतीच्या उमेदवाराला अधिक बळ मिळणार आहे. काळे-कोल्हे जरी एकञ असले तरी महायुतीचा उमेदवार कोण असेल यावर एकमत झाले नाही.
उमेदवार कोण असरणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. महायुतीच्या उमेदवारीवरून शिर्डी लोकसभा मतदार संघात रस्सीखेच सुरू आहे. विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांचा पत्ता कट होतो की, ते पुन्हा उमेदवारी खेचून खासदारकीची हॅटट्रिक साधणार याकडे लक्ष लागले आहे. खासदार लोखंडे यांना पुन्हा उमेदवारी मिळू नये म्हणून महायुतीचा कलह सुरू आहे. त्यांच्या ऐवजी इतर अनेक इच्छुक नावे पुढे येत आहेत. अनेक वर्षांपासून इच्छुक असलेले माजी मंत्री बबनराव घोलप हे नुकतेच शिंदेच्या सेनेत आल्याने त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
भाजपच्या वतीने केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही इच्छा व्यक्त केली आहे. मनसेचे भाजपशी युती झाल्याने मनसेचे बाळा नांदगावकर हेही शिर्डी लोकसभा मतदार संघात निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याची चर्चा असल्याने महायुतीत उमेदवारीचा घोळ सुरु असताना महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून भाऊसाहेब वाकचौरे यांची उमेदवारी निश्चित झाली. वाकचौरे यांनी प्रचारात आघाडी घेवून संपूर्ण कोपरगाव तालुका पिंजून काढला आहे. अनेक धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहुन वाकचौरे यांनी आपला माणूस आपल्यासाठी आहे हे सांगत सुटले. कोपरगावचे जावाई असल्याने वाकचौरे यांना कोपरगावमध्ये सध्या तरी अधिकचा मान मिळतोय.
दरम्यान काॅंग्रेसच्या एकनिष्ठ असलेल्या उत्कर्षा रुपवते यांचा संपर्क तालुक्यात मोठा आहे. त्या गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या कार्यातून जनतेच्या संपर्कात असल्याने त्यांच्या नावाची चर्चा जोरात आहे. परंतु एकनिष्ठ असलेल्या रुपवतेंना काॅंग्रेसकडू उमेदवारीच्या आशा मावळल्या आहेत. शिर्डीची ही जागा महाविकास आघाडीच्या कोट्यातून ठाकरेंच्या सेनेला गेल्याने रुपवते यांना इतर पर्याय शोधावा लागेल. सध्या कोपरगाव तालुक्यातून बंडाचे वादळ उठल्याने आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कायम आंबेडकरी विचारधारेच्या उमेदवारांना डावलण्यात आले.
इतर समाजाला पुन्हा पुन्हा संधी देवून आंबेडकरी विचारधारेच्या माणसांवर अन्याय केल्याचा रोष व्यक्त केला जातोय त्यामुळे रामदास आठवले गटाचे कोपरगावचे कार्यकर्ते दिपक गायकवाड यांनी शिर्डी लोकसभा निवडणुकीत अपक्ष लढण्याचा चंग बांधला आहे. तर मातंग समाजावर अन्याय होतोय म्हणून कोपरगावचे ॲड. नितीन पोळ हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे सांगितले. तसेच काॅंग्रेसचे तुषार पोटे हेही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने कोपरगाव येथुन खासदारकीची स्वप्न उराशी बाळगुन असलेल्यांची संख्या वाढत आहे.
सध्या तरी कोणीही रिंगणात उतरले तरी काळे कोल्हे यांची एकवटलेली ताकत कोणाला बळ देते हे आगामी काळात दिसेल. काळे कोल्हे आज तरी एकञ दिसत आहेत. निवडणुक काय होईल याकडे लक्ष लागले आहे.