पतीला मारहाण करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई बाबत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना पत्नीचे निवेदन

शेवगाव प्रतिनिधी, दि.०३ :  शेवगाव पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचा-यांनी केलेली मारहाण व दिलेल्या त्रासामुळे पोलीस ठाण्यातून तीन दिवसापूर्वी बेपत्ता झालेल्या पतीचा शोध घ्यावा व त्यास जबाबदार असणा-यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी शहरातील जनाबाई दीपक गावडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला व शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्याकडे काल निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान वंचित बहूजन आघाडीही हा प्रश्न धसास लावण्यासाठी सरसावली आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माझे पती दीपक गावडे यांना चार-पाच दिवसापासून पोलीस कर्मचारी फोन करून पोलीस ठाण्यात बोलावित होते. शनिवारी (दि.३० डिसेंबर) एका पोलीस उपनिरीक्षकांनी फोन करून धमकावून पोलीस ठाण्यात हजर रहा असे सांगितले. या दिवशी ते पोलीस ठाण्यात सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत होते. या वेळेत माझ्या पतीला पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांच्यासह पोलीस कर्मचार्यांनी मारहाण केली. त्यावेळी माझ्या पतीने मला व दीर सागर गावडे यांना फोन करून घडलेली माहिती दिली व हा माझा शेवटचा फोन आहे.

मी आत्महत्या करणार आहे असे सांगून फोन बंद केला आहे. माझ्या पती विरुध्द कुठलीही तक्रार नव्हती तरीही पोलीस अधिकारी-कर्मचारी यांनी त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून मारहाण केली, त्यांच्या त्रासाला कंटाळून माझ्या पतीने जर जीवाचे काही बरे-वाईट केले. तर त्याची सर्वस्वी जबाबदारी मारहाण करणारांची राहील. त्यामुळे या सर्वांवर कारवाई करून पती दीपक रावसाहेब गावडे यांना परत आणून द्यावे. अशी मागणी जनाबाई गावडे यांनी केली आहे.