शेवगाव प्रतिनिधी, दि. ६ : अलीकडे शेवगावात सामान्यांचे कोणतेही काम असो ते सहजासहजी सरळ मार्गाने होत नाही. त्यातच बहूतेक कार्यालयांत पाच दिवसाचा आठवडा असल्याने अडचणी वाढल्या आहेत. शनिवार रविवार जोडून रजा टाकण्याकडे अनेकांचा कल असतो. कोणत्याही कार्यालयात गेले की, संबंधित त्याच्याजागी सापडेल याचा भरवसा नसतो. बहूतेक त्यामुळे येथे इतर ठिकाणांपेक्षा टोकाची भूमिका घेऊन लढणाऱ्या संघटनांची संख्या अधिक आहे.
अस म्हणतात, पोट दुखणारा ओवा मागणारच. अडचणीत सापडलेला काम मार्गी लावण्यासाठी अशा संघटनाकडे आपली कैफियत मांडतो. संघटना वाकड्यात घुसली की त्याचा मार्ग सरळ होतो. त्यातून अनेकांना दिलासा मिळतो. असा अनुभव आहे.
तालुक्यात भारतीय कम्युनिस्ट पार्टी, किसान मोर्चा, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शाहू फुले आंबेडकर कलाम विचारवंत मंच, आणि अलीकडे वंचित बहुजन आघाडी या आक्रमक संघटना आहेत. तर महसूल कार्यालय, कृषी विभाग, पंचायत समिती, नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस ठाणे या विभागाच्या सर्वाधिक तक्रारी असतात. शेवगाव नगर परिषदेला कायम स्वरुपी मुख्याधिकारी नसल्याने शेवगाव शहराचा विकास बेवारस झाला आहे. येथील रस्त्याची गटारीची बहुतेक कामे नगरसेवकांनी किंवा त्यांच्या संबंधितांनी केली आहेत. ती अत्यंत निकृष्ट आणि अयोग्य असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत.
शेवगावच्या हमरस्त्यावर एक पेंटर गेल्या ३५ वर्षापासून आपला व्यवसाय करत आहे. येथे झालेल्या अतिवृष्टीचा फटका त्यालाही बसला आहे. त्या पेंन्टरच्या दुकानात गेल्या दोन महिन्यांपासून गटारीचे पाणी घुसले आहे. पेंटरने त्याची तक्रार नगरपरिषद कर्मचा-या कड़े केली. तेव्हा पेन्टरला, नगर परिषदेकडे जेसीबी नाही, गटार फुटलेली आहे .आम्ही काय करावे ?असे उत्तर मिळाले. आज उद्या कोणीतरी लक्ष घालेल म्हणून वाट पाहून त्याने अखेर वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण व तालुकाध्यक्ष प्यारेलाल शेख यांच्याकडे तक्रार केली.
तेव्हा ३५ वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या हातावर पोट असलेल्या पेंटरच्या दुकानात गटारीचे पाणी घुसत्याने तो रोजीरोटीला महाग झाला आहे, तेव्हा त्या गटारीचे काम त्वरित झाले नाही तर शहरातील घाण, कचरा व गटारीचे मैलामिश्रीत पाणी शेवगाव नगर परिषदेतील मुख्याधिकारी यांच्या दालनात आणून टाकले जाईल. असा हटके इशारा वंचित आघाडीने आज दिला आहे. आता कदाचित शहरातील गटारी तशाच अस्वच्छ राहतील मात्र पेंटरच्या दुकानात घुसलेले गटार लगेच स्वच्छ होईल. असा विश्वास पेंटरला मिळाला आहेे.