खड्ड्याचे श्राद्ध घालून गांधीगिरीने सार्वजनिक बांधकाम विभागाला आली जाग

शेवगाव प्रतिनिधी, दि. ६ : अखेर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने तालुका हद्दीतील सर्व राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम जोरात सुरू केले आहे. वास्तविक खड्डे बुजवून रस्त्याची डागडुजी न करता संपूर्ण रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे आवश्यक होते. मात्र किमान खड्डे बुजविण्यात येत असल्यामुळे सध्या प्रवाशांना होणारा त्रास कमी होणार आहे. हेहि  नसे थोडके अशी प्रतिक्रीया नागरिक व्यक्त करत आहेत!

 शेवगावच्या रस्त्याबाबत तक्रार, निवेदन, आंदोलनाचा इशारा, नाही असा एकही दिवस जात नाही. यासाठी विविध संघटना आपापल्या परीने हटके पद्धतीने रोज पुढे येत. येथे कोणी रस्त्यात वृक्षारोपण करून, कोणी खड्ड्यात झोपून, कोणी खड्ड्याचे श्राद्ध घालून गांधीगिरी केली आहे. तर कोणी अधिकाऱ्याच्या तोंडाला काळे फासण्याचा निर्वाणीचा इशारा दिला.
इतकेच काय पण नुकतेच एक तारखेला शहरातील गौतमी नांगरे या तीन वर्षाच्या मुलीसमवेत राजनंदिनी फुंदे, यश फुंदे, युवराज दुसंग, शैलेश तिजोरे, आरव तिजोरे, सुयेश मगर, साई केमसे, श्रद्धा केमसे,  अमन विश्वकर्मा, पूजा विश्वकर्मा, काजल विश्वकर्मा, सुरज नांगरे, गौरव नांगरे, साईराज नांगरे, राज वरे, सायली वरे, आदि  बालगोपाळांनी  रस्त्यIतील  खड्ड्याला आमदार खासदाराची नावे देत मोठ्या कार्यकर्त्यांनाही लाजवेल असे अभिनव आंदोलन केले. रस्त्याची डाग डुजीनको तर रस्त्याची कामे करावीत अशी समंजस मागणी त्यांनी केली होती.

शेवगाव-पैठण, शेवगाव मिरी मार्गे नगर, तिसगाव मार्गे नगर, शेवगाव – नेवासे असा शेवगावातील कोणताही राज्य मार्ग घ्या ;  यातील कोणता राज्य मार्ग बरा हे सांगणे  पेंच ठरावा असे हे एकापेक्षा एक खराब रस्ते आहेत. गावांतर्गत रस्त्यांची स्थिती यापेक्षा वेगळी नाही. एकादशीला पांडुरंगाच्या दर्शनाला धाकट्या पंढरीला जाणाऱ्या भाविकांना तसेच श्रीक्षेत्र अमरापूरच्या श्री रेणुकामातेच्या, तसेच देवी निमगावच्या भवानी मातेस हिंगणगाव मार्गे  दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना मोठे  हाल सोसावे लागतात.

शेवगाव जिल्ह्यात तसेच राज्यात  अनेक चांगल्या बाबतीत अव्वल आहे. तसाच अत्यंत खराब रस्त्यासाठी देखील तालुका अव्वल स्थानी  असणार  यात शंका नाही. मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच येथे झालेल्या रस्त्यांच्या निकृष्ठ कामामुळे सर्व रस्ते उखडले आहेत. रस्त्यात जागोजागी अगणित खड्डे असल्यामुळे , रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असा प्रश्न पडावा. अशी स्थिती आहे. पायी चालणाऱ्याला वा दुचाकी स्वरांनाही खड्डा चुकविता येत नाही. त्यामुळे तालुक्यात पाठ दुखी व मणक्याच्या विकाराचे रुग्णांची संख्या अधिक आहे.

ज्यांना रोजी रोटी साठी रोज प्रवासा शिवाय पर्याय नाही, अशा येथील नोकरदार  व व्यावसायिकांमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक आहे.  मागील पंधरवड्यात महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी करण्यासाठी तालुक्याच्या पूर्व भागात  हेलिकॉप्टरने आले.  प्रशासनाने त्यांना  खराब रस्त्याच्या अवस्थेबाबत अगावू कळविल्यामुळेच ते हेलिकॉप्टरने आले. असा येथील आंदोलकांचा दावा आहे.  त्यात तथ्य असल्याचे नाकारता येत नाही.