शिवसेनेच्या पदाधिकारी बंधूना तीन दिवस पोलिस कोठडी

शेवगाव प्रतिनिधी, दि .१ : शेवगाव नगरपरिषदेच्या महिला सफाई कर्मचा-यांना शिवीगाळ करणाऱ्यास समजावून सांगणाऱ्या नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाच्या मुकादमास मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या फिर्यादीवरून शिवसेनेच्या दोघा पदाधिकाऱ्याविरुध्द शेवगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन आज  न्यायालयासमोर  हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.  पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांचे मार्गदर्शनाखाली सपोनी विश्वास पावरा अधिक तपास करत आहेत.

        सिद्धार्थ किसन काटे व त्याचा भाऊ शिवाजी किसन काटे रा. शास्त्रीनगर शेवगाव अशी आरोपीची नावे असून त्यांच्या विरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी सिद्धार्थ काटे शिवसेना शहरप्रमुख तर त्याचा भाऊ शिवाजी काटे शिवसेना जिल्हा उपप्रमुख म्हणून कार्यरत असल्याने ही घटना तालुक्यात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.

      याबाबत नगरपरिषदेतील आरोग्य व सफाई विभागाचे मुकादम सुरेश जयसिंग चव्हाण यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, शुक्रवारी ( दि.३० )  आपण कामावर असताना दुपारी ३.३० च्या सुमारास नगरपरिषदेच्या दोन सफाई महिला कर्मचा-यांचा आपणास फोन आला. त्यांनी सांगितले की, आम्ही शास्त्रीनगर परिसरात साफसफाईचे काम करीत असताना सिद्धार्थ काटे याने, तुम्ही चांगल्या प्रकारे साफसफाई करीत नाहीत.

फुकटचा पगार घेता असे म्हणून आपल्याला शिवीगाळ केली आहे. त्यावर मी नगरपरिषदेतील  सफाई विभागाचे मुकादम रमेश खरात व संजय लांडे यांना सोबत घेवून सिद्धार्त काटे यांना समजावून सांगत असताना सिद्धार्थ याने शिवाजी काटे यास फोन करुन घटनास्थळी बोलावून घेऊन दोन्ही भावांनी मला व रमेश खरात यांना मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली.

शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या घटनेची माहिती नगरपरिषदेचे वरिष्ठ अधिकारी बबनराव राठोड यांना दिली.  त्यांनी मला व रमेश खरात यांना नगरपरिषदेच्या लेटरहेडवर पत्र देवून पोलीस स्टेशनला रीतसर फिर्याद दाखल करण्याचे आदेश दिल्याचे नमुद केले आहे.

त्यानुसार  मुकादम सुरेश जयसिंग चव्हाण यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरुन शेवगाव पोलिसांनी भादवी कलम ३५३, ५०४, ५०६, ३४, ३३२ अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपी सिद्धार्थ व शिवाजी काटे यांना ताब्यात घेऊन शेवगाव न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.