सहकारमंत्री नामदार अतुल सावे यांची कोल्हे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

कोपरगाव प्रतिनिधी, दि . १० : सहकार आणि इतर मागास व बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे शुक्रवारी (१० फेब्रुवारी) कोपरगाव दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात ना. अतुल सावे यांनी कोल्हे वस्ती येथील स्नेहलता कोल्हे यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार स्नेहलताताई कोल्हे तसेच सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक युवा नेते विवेक कोल्हे यांनी ना. अतुल सावे यांचे स्वागत केले.

ना. सावे यांनी माजी मंत्री सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण केली. तसेच श्रीमती सिंधुताई (माई) कोल्हे यांचे आशीर्वाद घेतले. कोल्हे परिवारातील सदस्य यावेळी उपस्थित होते.

सहकारमंत्री अतुल सावे यांचे वडील स्व. मोरेश्वरराव दीनानाथ सावे हे १९८९-१९९१ आणि १९९१ ते १९९६ या काळात औरंगाबादचे खासदार होते. तत्पूर्वी १९८८ मध्ये त्यांनी नगरसेवक आणि १९८९-९० या काळात  औरंगाबादचे महापौर पद भूषविले होते. माजी मंत्री सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हे यांच्याप्रमाणेच स्व. मोरेश्वरराव सावे यांनी देखील सामाजिक, राजकीय, उद्योग, सांस्कृतिक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. 

  सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हे आणि स्व. मोरेश्वरराव सावे यांचे अतिशय जिव्हाळ्याचे, स्नेहाचे संबंध होते. हा ऋणानुबंध आजही कायम आहे. औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) पूर्व विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार व राज्याचे सहकारमंत्री असलेले ना. अतुल सावे हे स्व. मोरेश्वरराव सावे यांचा राजकीय व सामाजिक कार्याचा वारसा पुढे चालवत आहेत. आज कोल्हे परिवारातील सदस्यांसोबत चर्चा करताना सहकारमंत्री ना. अतुल सावे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. माजी मंत्री सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हे यांनी राजकीय, सामाजिक, सहकार, कृषी, साखर उद्योग, शिक्षण क्षेत्रात बहुमोल कामगिरी केली आहे.

कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचा कायापालट घडवून आणणाऱ्या  स्व. शंकरराव कोल्हे यांना शेती, पाणी, सहकार, साखर कारखानदारी आदी विषयांचा दांडगा अभ्यास होता. स्व. शंकरराव कोल्हे हे राजकारण, समाजकारण व सहकार चळवळीतील एक दीपस्तंभ असून, तरुण पिढीने त्यांचा आदर्श घेण्याची गरज असल्याचे सांगून ना. अतुल सावे यांनी स्व. शंकरराव कोल्हे यांच्या कार्याची प्रशंसा केली.

स्व. शंकरराव कोल्हे यांच्या पश्चात बिपीनदादा कोल्हे, स्नेहलता कोल्हे, विवेक कोल्हे तसेच संपूर्ण कोल्हे परिवार त्यांचा आदर्श विचार पुढे नेत निरपेक्ष भावनेने जनसेवा करत आहे. कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या समस्या व विकासाचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी कोल्हे परिवार शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा करत आहे याबद्दल ना. सावे यांनी कौतुकोदगार काढले. या उपक्रमांचे ना. सावे यांनी कौतुक केले.

याप्रसंगी स्नेहलता कोल्हे व विवेककोल्हे यांनी ना. अतुल सावे यांच्याशी कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांवर चर्चा केली.व विवीध प्रश्न मार्गी लावण्यासंबंधी कोल्हे यांनी केलेल्या मागणीला ना. सावे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. विवेकभैय्या कोल्हे यांनी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना आणि संजीवनी उद्योग समूहामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती मंत्री ना. अतुल सावे यांना दिली.