कर वसुलीसाठी नगरपरिषदेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी केली वाजत गाजत शहरातून जनजागृती

१०.२० कोटी रुपयांची कर थकबाकी

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १० : आज दिनांक १०/०२/२०२३ रोजी कोपरगाव नगरपरिषदे मार्फत मा.मुख्याधिकारी तथा प्रशासक शांताराम गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०२२-२३ आणि यापूर्वीच्या थकीत घरपट्टी आणि पाणीपट्टी करदात्यांच्या जनजागृतीसाठी शहरातून फेरीचे आयोजन करण्यात आले होते.

          या प्रसंगी कोपरगाव नगरपरिषदेचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी सहभाग घेतला. अत्यंत नाविन्यपूर्ण अशा कल्पनेतून या फेरीचे आयोजन केले गेले. फेरीमध्ये ढोल ताशा आणि कर वसुली बाबत जनजागृती फलकांचा वापर केला गेला. या फेरीच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना वेळेत कर भरणा करणे बाबत सूचित करण्यात आले.

सध्या कोपरगाव नगरपरिषदेची कर वसुली बाबतची परिस्थिती बघता घरपट्टी संकलित कर एकूण मागणी रु.६०५८६५५३/- सन २०२२-२३ मध्ये आज पावेतो वसुली रक्कम रु.१८४८५६६९/- तर थकबाकी रक्कम रु.४२०१३१३१ /- इतकी आहे. त्याचप्रमाणे पाणीपट्टी कर मागणी रक्कम रु.६४७९५१७५ /- सन २०२२-२३ मध्ये आज पावेतो वसुली रक्कम रु.१६०२०५९२/- तर थकबाकी रक्कम रु.४८७७४५८३/- तसेच नगरपरिषद मालकीचे गाळा भाडे कर मागणी रक्कम रु.१४२१०४१५/- सन २०२२-२३ मध्ये आज पावेतो वसुली रक्कम रु.३०८१०३४/- तर थकबाकी रक्कम रु.१११२९३८१/-  इतकी आहे. एकूणच वरीलप्रमाणे शहरातील करदात्यांकडे सर्वमिळून रक्कम रु.१०१९१७०९५/- इतक्या मोठ्या प्रमाणात थकबाकी रक्कम आहे.

         स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विकासात आणि शहराच्या सुख सुविधा वाढविणे कामी जमा होणाऱ्या संकलित कराला महत्वाचे स्थान आहे.संकलित कराच्या आधारेच शहर विकासाचे नियोजन करणे शक्य होते.आणि जर संकलित कर जमा झाला नाही तर नागरिकांना पुरविल्या जाणाऱ्या सुखसुविधा देण्यास स्थानिक स्वराज्य संस्थेला बंधने येतात. त्यामुळे शहराचा विकास होणे कामी आणि नागरिकांना दर्जेदार मुलभूत सुविधा पुरविता याव्यात  यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या कडील देय्य कर रक्कम वेळेत जमा करून नगरपरिषदेस सहकार्य करावे असे अवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक शांताराम गोसावी साहेब यांनी केले.

            सदरची थकबाकी रक्कम वसूल करण्यासाठी शासनाने कादेशीर तरतुदीही केलेल्या आहेत, जर थकीत करदाता आपल्याकडील थकीत कर रक्कम स्थानिक स्वराज्य संस्थेस भरण्यास टाळाटाळ करत असेल तर थकबाकीदारांचे नळ कनेक्शन बंद करणे, थकबाकीदार याच्या नावांची यादी दैनिक वर्तमानपत्रात तसेच शहरातील मुख्यचौकात फलकावर जाहीर रित्या प्रसिध्द करणे,थकबाकीदार यांचे घरासमोर ढोल वाजविणे,थकबाकीदारांच्या नावाची लाऊडस्पिकर वर अनौस्मेनट करणे, थकबाकीदारांची मालमत्ता जप्त करणे, जप्त केलेली मालमत्ता विक्री करणे, त्याच प्रमाणे थकबाकीदार यांच्या विरुद्ध न्यायालयात दावा सुद्धा दाखल केला जाऊ शकतो याबाबत थकबाकीदार नागरिकांनी नोंद घ्यावी असे देखिल अवाहन कोपरगाव नगरपरिषदेमार्फत करण्यात आले आहे.  

            सदर जनजागृती फेरीच्या माध्यमातून थकबाकीदार नागरिकांना वारंवार सूचित करून देखिल जे नागरिक आपल्याकडील थकबाकी जमा करत नसेल तर वरीलप्रमाणे कायदेशीर मार्गाचा अवलंब केला जाऊ शकतो असाही संदेश नगरपरिषदे मार्फत देण्यात आला आहे.