रस्त्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक पालिकेच्या दारात

हक्काच्या रस्त्यासाठी अनेक वर्षांपासून संघर्ष करण्याची वेळ 

 कोपरगाव प्रतिनिधी, दि.१८ : देशाला स्वातंत्र्य मिळाले एका बाजूला अमृतमहोत्सव साजरा केला जातोय माञ कोपरगाव शहरातील नागरीकांना त्यांच्या राहत्या घराकडे जाण्यासाठी आजूनही व्यवस्थित रस्ता नाही. हक्काचा असलेला रस्ता  बंद करून अन्याय केल्याच्या कारणाने एका पोलीस अधिकाऱ्याला व त्या भागातील नागरीकांना रस्ता मिळवण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष करण्याची वेळ आली आहे. 

कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक ३ मधील सर्व्हे नं. २१३/३ मध्ये रेव्हेन्यु हौसिंग सोसायटी येथून नागरिकांचा येण्या जाण्याचा महत्वाचा रस्ता काही ठराविक महसुलच्या कर्मचाऱ्यांच्या हव्यासापोटी व आकसापोटी जाणुनबुजून बंद केला असल्यामुळे या भागातील सर्वसामान्य नागरिकांची येणे जाण्यासाठी मोठी गैरसोय झाली आहे. लांबून वळसा घालुन छोट्या रस्त्यावरुन ये-जा करावे लागत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून येथील स्थानिक नागरिक रस्त्यासाठी लढा देत असून अनेक वेळा विविध ठिकाणी तक्रारी, अर्ज करून सुद्धा कोपरगाव नगरपालीकेचे अधिकारी हा रस्ता मोकळा करीत नाहीत. अखेर संतापलेल्या नागरिकांनी व सहाय्यक पोलीस निरीक्षक दिंगबर कोपरे यांनी थेट कोपरगाव नगरपालीका गाठली. यावेळी या भागातील अनेक रहिवासी व ठाणे येथे पोलीस खात्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर कोपरे हे पालिकेचे दारात उभे राहुन रस्त्याची मागणी करीत होते.  खाकी वर्दीतला एक पोलीस अधिकारी सर्वसामान्यांच्या न्यायासाठी कर्तव्य बजावत असताना आज त्याच अधिकाऱ्यावर अन्याय होत असल्याची चर्चा पालीका परिसरात जोरदार सुरु होती. 

वारंवार मागणी करुनही पालिका प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्याने दिगंबर कोपरे यांनी खंत व्यक्त केली. यावेळी नागरिकांनी पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना निवेदन दिले असून लवकरात लवकर हक्काचा रस्ता खुला झालं नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. आपल्या निवेदनात दिला. 

निवेदनात पुढे म्हणाले की, रितसर मंजूर ले-आऊट मधील प्लॉट नं. ८ व ९ मधून २५ फूटाचा रस्ता हा सर्व्हे नं.२१४ कडे जातो. तसेच प्लॉट नं.१६ व १७ मधून २५ फूटाचा रस्ता कोपरे कॉलनी (सर्व्हे नं.२१४/९७) कडे जातो. या रितसर हक्काच्या रस्त्यावर रेव्हेन्यू कॉलनीच्या नागरीकांनी चक्क पञे मारुन फाटक लावले तर एका ठिकाणी तर भिंत बांधून रस्त्या बंद केलेला आणि त्या उर्वरित जागेवर कच्चे बांधकाम करुन खाजगी मालकी सारखा वापर सुरु केला. रेव्हेन्यू काॅलनीत राहणारे सर्व हे महसूल विभागातील कर्मचारी आहेत.एकेकाळी त्यांनीच तालुक्यातील अनेकांना शिवरस्ते मोकळे करुन दिले. रस्ता न देणाऱ्या नागरीकांवर गुन्हे दाखल केले. प्रत्येकांना रस्ता देणारे हेच कर्मचारी रस्ता अडवतात हे माञ विशेष आहे. 

नगरपरिषदेमार्फत रेव्हेन्यु कॉलनीत अतिक्रमण करणाऱ्यांना गेल्या दोन वर्षांपूर्वी रितसर नोटीसा गेल्या. मा. न्यायालयाचा कोणताही मनाई हुकूम नसतांना सदर रस्त्यावर पत्रे लावुन बंद करण्यात आला आहे. सदर रस्ता खुला करण्यात यावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे दिगंबर कोपरे व नागरीकांनी केली आहे. दिलेल्या निवेदनावर दिगंबर कोपरे, ज्ञानेश्वर लाड, भास्कर अहिरे, सुनीता हजारे, अन्वर पठाण, अकबर पठाण, अशोक आढाव, वाहिद पठाण, अफरोज पठाण, शाहिद पठाण, आयाज पठाण, यासीन पठाण, फिरोज पठाण, गफार पठाण, छोटू पठाण आदींसह नागरिकांच्या सह्या आहे. सर्वसामान्य नागरीकांची ही व्यवस्था सोडवण्यासाठी पालीका प्रशासन कधी सकारात्मक भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.