बाजार समितीची निवडणूक ही शेतक-यांच्या प्रपंचाची निवडणूक – माजी आमदार घुले

शेवगाव प्रतिनिधी, दि . २७ :   बाजार समितीची निवडणूक ही शेतक-यांच्या प्रपंचाची निवडणूक असल्याने गावागावातील कार्यकर्त्यांनी राजकारणातील आपले मतभेद बाजूला ठेवून शेतक-यांचे कल्याण व आर्थिक प्रगती महत्वाची समजून शेतक-यांना न्याय देणाऱ्या राष्ट्रवादी प्रणीत ज्ञानेश्वर शेतकरी विकास मंडळामागे आपली शक्ती समर्थपणे उभी करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन लोकनेते मारुतराव घुले पाटील, ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आमदार डॉ.नरेंद्र पाटील घुले  यांनी केले.

     शेतकऱ्याची कामधेनु असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या संदर्भात राष्ट्रवादी प्रणित  ज्ञानेश्वर शेतकरी विकास मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या आयोजित मेळाव्यात माजी आमदार डॉ.घुले अध्यक्ष पदावरून बोलत होते. माजी आमदार चंद्रशेखर घुले, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ.क्षितीज घुले,  काकासाहेब नरवडे, ज्येष्ठ नेते अरुण पाटील लांडे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ.घुले पुढे म्हणाले , लोकनेते मारुतराव घुले पाटील यांनी या परिसरातील शेतक-यांना न्याय मिळावा यासाठी सुमारे ५० वर्षापूर्वी बाजार समितीची मुहूर्तमेढ रोवली. गेली अनेक वर्ष संस्थेवर राष्ट्रवादीच्या घुले गटाचे वर्चस्व कायम आहे. जिल्ह्यातील इतर बाजार समितीच्या तुलनेत शेवगावच्या बाजार समितीचा लौकिक राज्यात सर्वदूर पोहचलेला आहे.  बाजार समितीचा कारभार पारदर्शीपणे होत असून येथे सदासर्वकाळ शेतक-यांना न्याय देण्याचा प्रयत्न झाला आहे . तोच पायंडा पुढेही राहणार आहे.

       संचालक मंडळाच्या निवडणुकीत जागा मर्यादित मात्र इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने उमेदवार कोण यापेक्षा ज्ञानेश्वर शेतकरी विकास मंडळ  महत्वाचे समजून शेतक-यांची कामधेनु ठरलेली संस्था या पुढील काळातही सुरळीत सुरु राहील. या पद्धतीने सर्वांनी संघटीत होवून एक संघ पणाने निवडणुकीला सामोरे जाणे आवश्यक आहे.

      तालुक्यात लोकविकासाचे अनेक प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित असतांना लोकप्रतिनिधींकडून विकास कामांसाठी कोटीच्या कोटी रुपये उपलब्ध झाल्याच्या केवळ घोषणा होतात मात्र विकास कामे प्रत्यक्षात दिसत नसल्याने आता जनतेनेच लोकप्रतिनिधींना त्याचा खुलासा मागणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.    

        राष्ट्रवादी युवक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे यांनी बाजार समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जाची व त्यासाठी  आवश्यक असलेल्या कागदपत्रांची माहिती दिली. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कल्याण नेमाने शहराध्यक्ष मन्सूर फारुकी, युवक संघटनेचे तालुकाध्यक्ष नंदकिशोर मुंढे,  पंडितराव भोसले, रामनाथ राजपुरे, शरद सोनवणे, ताहेर पटेल, एजाज काझी, बापूसाहेब गवळी, भगवान धूत, बाळासाहेब विघ्ने, बप्पासाहेब पावसे, निवृत्ती दातीर, आदिंची भाषणे झाली. तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य सेवा सहकारी संस्थाचे चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक मंडळाचे सदस्य, व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी सभापती अनिल मडके यांनी आभार मानले.