महिला व लोकप्रतिनिधीबद्दल बोलताना भान ठेवायला हवे – आमदार राजळे

शेवगाव प्रतिनिधी, दि. २५ : वर्षानुवर्षे सर्व सत्तास्थाने ताब्यात असताना दुध संघ, खरेदी विक्री संघ, जिनिंग, बाजार समिती या संस्था मोडकळीस का आल्या याचा विचार तालुक्यातील नेतृत्वाने करावा. सुसंस्कृत घराण्याचे वारसदार म्हणून सांगताना महिला व लोकप्रतिनिधीबद्दल पातळी सोडून बोलणे ही जिल्ह्याची राजकीय संस्कृती नाही. याचे भान ठेवायला हवे. एखाद्यावर आरोप करतांना चार बोटे आपल्या कडे असतात त्याचेही आत्मपरिक्षण करायला हवे. अशा शब्दात आमदार मोनिकाताई राजळे यांनी विरोधकांचा नामोल्लेख न करता समाचार घेतला.

      भाजप व मित्र पक्ष प्रणित आदिनाथ शेतकरी विकास मंडळाच्या प्रचाराचा शुभारंभ आव्हाणेच्या स्वयंभू निद्रिस्त गणपती मंदिरा जवळ  मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, माजी जि.प.सदस्य नितीन काकडे, तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे, महिला तालुकाध्यक्ष आशा गरड, बापुसाहेब भोसले, बापु पाटेकर, कचरू चोथे, सोमनाथ कळमकर, भिमराज सागडे, उमेश भालसिंग, वाय डी कोल्हे , शशिकांत खरात, संदिप सातपुते, महेश फलके, लक्ष्मण टाकळकर आदी प्रमुख उपस्थित होते. केशव महाराज गुजर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

    आमदार राजळे म्हणाल्या, कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक असतांना विरोधक विधानसभेची व जिल्हा सहकारी बँकेची चर्चा करत  आहेत. तुमच्या ताब्यात एवढ्या वर्षा पासून संस्था आहे तेथे तुम्ही काय कारभार केला,शेतकऱ्यांना काय सुविधा दिल्या , एखादे वेअर हाऊस , महिला स्वच्छता गृह उभारले का यावर बोला.आपल्या ताब्यातील संस्थांचा कारभार झाकून ठेवणारांना आमच्या कामावर,संस्थेवर बोलण्याचा अधिकार नाही, असा टोला त्यांनी लगावला.

       लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या कामाची जबाबदारी आहे, विकास कामांचा शंभरटक्के दावा आपण करत नाही. पण प्रामाणिक प्रयत्न मात्र करत आहोत. केंद्र व राज्य सरकारच्या सहकार, कृषी व पणन विभागाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी व भ्रष्टाचारमुक्त कारभारासाठी बाजार समितीत परिवर्तनाची संधी  आहे.तालुक्यातील सुज्ञ मतदार ती सोडणार नाही. असेही त्यांनी शेवटी म्हटले.

      यावेळी सोमनाथ कळमकर,शशिकांत खरात,वाय डी कोल्हे,उमेश भालसिंग, बापु पाटेकर, बापुसाहेब भोसले,गणेश रांधवणे,अमोल फडके,नितीन काकडे,अरुण मुंडे आदींची भाषणे झाली. तुषार पुरनाळे,अमोल सागडे, कासम शेख,संतोष डुरे,संदीप वाणी, सर्व उमेदवार व पंच कोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कचरू चोथे यांनी प्रास्ताविक केले तर राजू सुरवसे यांनी सुत्रसंचालन केले.महादेव पवार यांनी आभार मानले.