गारपीटीने पूर्व भागातील शेतकरी नागवला

शेवगाव प्रतिनिधी, दि. २७: तालुक्यातील पूर्व भागातील  बोधेगाव बालमटाकळी कांबी हादगाव मुंगी परिसरात काल बुधवारी (दि २६ ) झालेल्या पावसाने शेती पिकाचे मोठे नुकसान झाले.  भाजीपाला, चारा पिके,  काढणी झालेल्या पिकाचे मोठे नुकसान झाले.

यामध्ये  गोळेगाव, लाड जळगाव, राणेगाव, नागलवाडी, कोणोशी, सुकळी परिसरात देखील वादळासह मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतीतील कांदा, उन्हाळी बाजरी, भुईमूग, मका, फळ बागांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा द्यावा अशी मागणी परिसरातून होत आहे.

     पुरेशा खतांचा अभाव, वीजेचा लपंडाव अशा अनेक अडचणीमुळे शेतीचे मोठे नुकसान होत असताना त्यावर मात करत    थोड्या फार आलेल्या पीकाना नुकत्याच झालेल्या गारपीटीमुळे फटका बसला. शेतकऱ्यांच्या हाता तोंडासी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावला गेला आहे.

गेल्या वर्षापासूनच शेतकऱ्यावर संकटा मागून  संकटे येत आहेत. त्यामुळे या भागातील शेतकरी हातबल झाला असून गारपीटग्रस्त सर्व शेती पिकाचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा  द्यावा अशी शेतकर्‍याची मागणी आहे.