कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३० : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान व महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरगाव शहरासाठी महाविकास आघाडी सरकारकडे केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव शहरासाठी मागील वर्षी तीन अर्बन हेल्थ सेंटर मंजूर झालेले आहेत. उद्या (सोमवार दि.०१) पासूनहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना व दोन शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र अर्थात अर्बन हेल्थ सेंटर नागरिकांच्या सेवेत रुजू होणार असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.
दोन वर्ष कोरोना महामारीमुळे संपूर्ण विश्वाचे अस्तित्व धोक्यात आले होते. त्यामुळे आरोग्याच्या बाबतीत आपल्याला कायमस्वरूपी सतर्क राहणे गरजेचे असल्याचे कोरोना महामारीने दाखवून दिले आहे. याचा धडा घेवून नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्या यासाठी आ. आशुतोष काळे यांनी महाविकास आघाडी सरकारकडे केलेल्या पाठपुराव्यातून ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन होवून ग्रामीण रुग्णालयाला १०० बेडचा उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला आहे.
कोपरगावकरांना अधिकच्या आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आ.आशुतोष काळे यांनी महाविकास आघाडी सरकारकडून मागील वर्षी (एप्रिल २०२२ मध्ये) राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान व महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा यांच्या अंतर्गत ३ अर्बन हेल्थ वेलनेस सेंटर मंजूर करून आणले आहेत.
यामध्ये कोपरगाव शहरातील श्री छत्रपती संभाजी महाराज चौक रमेश मोरे व्यापारी संकुल या ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना व खडकी परिसर तसेच अंबिकानगर या ठिकाणी शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र उभारली जाणार आहे. या अर्बन हेल्थ वेलनेस सेंटरमध्ये ०१ डॉक्टर, ०१ परिचारिका, ०१ बहुउद्देशीय कर्मचारी व ०१ परिचर असे एकूण ०४ आरोग्य कर्मचारी नागरिकांना मोफत आरोग्यसेवा देणार आहे.
जीवघेण्या कोरोना महामारीत आ. आशुतोष काळे यांनी अतिशय चांगल्या प्रकारे योग्य नियोजन करून आरोग्य विभागाला केलेली सर्वोतोपरी मदत त्यामुळे कोपरगाव तालुक्यात कोरोना संसर्ग नियंत्रणात ठेवण्यात यश मिळाले. नागरिकांच्या आरोग्याच्या बाबतीत कायमच सतर्क असणाऱ्या आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरासाठी तीन अर्बन हेल्थ वेलनेस सेंटर मंजूर करून आणले व महाराष्ट्र दिनापासून हि आरोग्य केंद्र कोपरगावकरांच्या सेवेत रुजू होत आहे.
याठिकाणी सर्व उपचार मोफत मिळणार असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य अबाधित राहण्यास मोठी मदत होवून आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांची मोठी सोय होणार आहे. त्याबद्दल कोपरगाव शहरातील नागरिकांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.