डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं वावड असणाऱ्यांनी या देशातलं पाणीही पिवू नये – डॉ. राजरत्न आंबेडकर

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १७ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कधीच भेदभाव केला नाही. या देशातील प्रत्येकांच्या घरात विद्युत पुरवठा करण्याची व्यवस्था केली, प्रत्येकांच्या घराघरात, पिण्यासाठी पाणीपुरवठा योजनांची व्यवस्था केली इतकंच काय तर शासकीय सेवेत नौकरी आणि हक्काच्या सुट्ट्यांची व्यवस्था करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचं वावड असणाऱ्यांनी या देशाचं पाणी सुध्दा पिवू नये असा टोला. राजरत्न आंबेडकर यांनी लगावला.

 बुध्दीस्ट यंग फोर्सच्या वतीने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळील मुख्य रस्त्यावर विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार उभारण्यात आले असुन त्याचा लोकार्पण सोहळा बौध्द महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजरत्न आंबेडकर यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी राजरत्न आंबेडकर हे बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सेवानिवृत्त सचिव साहेबराव कोपरे होते. तर आमदार आशुतोष काळे, राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे उपाध्यक्ष रमेश घोडेगाव, डॉ. गोवर्धन हुसळे, सरोज हुसळे, गोरक्षनाथ रोकडे, बुध्दीस्ट यंग फोरमचे अध्यक्ष विजय ञिभुवन, उपाध्यक्ष नितीन शिंदे, सचिव राहुल खंडीझोड, लोकार्पण समितीचे अध्यक्ष संजय कांबळे, भिमराज गंगावणे, मनोज शिंदे, माजी नगराध्यक्षा सिंधुताई कोपरे, सोमनाथ खंडीझोड, अरुण ञिभुवन, नानासाहेब रणशूर, भास्कर गंगावणे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना राजरत्न आंबेडकर पुढे म्हणाले की, आंबेडकरांच्या नावाने रस्ते करण्याची गरज नाही तर त्यांनी दाखवलेल्या रस्त्याने जाण्याची गरज आहे. आपण थोर महापुरुषांना एक जातीच्या पेटाऱ्यात बंदीस्त केले. त्यांना त्यातुन मुक्त करण्याची गरज आहे. जेव्हा छञपती शिवाजी महाराज लढत होते तेव्हा ‘हिंदू’ शब्दाचा उगमही झाला नव्हता. त्यांची लढाई रयतेच्या राज्यासाठी होती. त्यांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून प्रजासत्ताक राज्य निर्माण करून शिवाजी महाराजांचे अपुर्ण स्वप्न पुर्ण केले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा लढा कधीच एका जाती धर्मासाठी नव्हता त्यांनी सर्वांसाठी संघर्ष केला.

देशातल्या जातीय व्यवस्थेमुळे त्यांच्या पोटच्या चार मुलांचा मृत्यु उपचारा अभावी झाला. आपल्या पोटच्या चार मुलांचा बळी या जातीय व्यवस्थेने घेतला पण या पुढे पुन्हा कोणाचा बळी जावू नये म्हणून त्यांनी संविधानातील खास व्यवस्था केली. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे जागातल्या इतर देशांना कळाले माञ भारतातल्यांना  कळाले नाहीत. जगातील अग्रक्रमांतील पहील्या पाच विद्यापीठांनी डॉ. आंबेडकर यांच्या जीवन चरिञासह त्यांनी स्विकारलेल्या धम्माची माहिती समजुन घेण्यासाठी माझे व्याख्याने ठेवतात. मला भाषणासाठी आवर्जून बोलावतात पण आपल्या देशातील एकाही विद्यापीठाने मला भाषणासाठी बोलावले नाही अशी खंत राजरत्न आंबेडकर यांनी व्यक्त केली. भारतातच जाती धर्मावर मतं मागितले जातात पण विकासाच्या मुद्द्यावर का मागितले जात नाहीत. 

या देशातली समानता नाहीशी झाली आहे.  ओबीसींच्या हितासाठी आपल्या मंञी पदाचा राजीनामा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला होता. पण आत्ताचे त्यांचेच नेते सत्तेसाठी चिकटून बसलेत. देशाचे नविन संविधान तयार करण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून प्रयत्न करीत आहेत पण अजुनही दोन पानं तयार करता आले नाही.  संपूर्ण देश तुमच्या ताब्यात असतांनाही संविधान हटवण्यासाठी ही व्यवस्था का कामाला लागली आहे असेही ते म्हणाले. 

यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी उपस्थितांना मानाचा जय भीम घालुन भाषणाला सुरुवात करीत राजरत्न आंबेडकर यांच्याकडे पाहिल्यावर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची छबी आठवते. स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर असल्याचे वाटतात. असे म्हणत काळे यांनी राजरत्न आंबेडकर यांच्या कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय कांबळे यांनी केले तर यावेळी विजय वहाडणे, डॉ.गोवर्धन हुसळे, विजय ञिभुवन यांनी मनोगत व्यक्त केले. 

 डॉ. गोवर्धन हुसळे व सरोज हुसळे यांनी शहरातील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराच्या उभारणीसाठी भरीव आर्थिक मदत केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. 

 बुध्दीस्ट यंग फोर्सच्या वतीने डॉ. राजरत्न आंबेडकर यांचे कोपरगाव शहरात जंगी स्वागत करण्यात आले. जेसीबीने फुलांचा वर्षाव करुन फटाक्यांच्या आतिषबाजीने सर्वांचे लक्ष वेधले होते. या अभिनव स्वागताने राजरत्न आंबेडकर भारावून गेले होते.

.