मतदारसंघासह राज्यातील बळीराजा सुखी होऊ दे, स्नेहलता कोल्हे यांचे खंडेरायला साकडे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१९ : चंपाषष्ठीच्या शुभ मुहूर्तावर माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगाव तालुक्यातील खोपडी येथील श्री खंडोबा देवस्थानला भेट देऊन श्री खंडोबारायाचे मनोभावे दर्शन घेतले. सर्व भाविकांना त्यांनी चंपाषष्ठीच्या शुभेच्छा दिल्या. प्रत्येकाच्या जीवनात सुख-समृद्धी येऊ दे, सर्व संकटे व दु:ख दूर होऊन आनंद येऊ दे, सर्वांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण होऊ दे, कोपरगाव मतदारसंघासह राज्यातील बळीराजा सुखी होऊ दे, शेतशिवार फुलू दे, सर्व नागरिकांना निरोगी दीर्घायुष्य लाभू दे, असे साकडे त्यांनी यावेळी श्री खंडोबारायाच्या चरणी घातले.

चंपाषष्ठीच्या निमित्ताने खोपडी येथील श्री खंडोबा देवस्थानमध्ये आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता सोमवारी (१८ डिसेंबर) श्रीक्षेत्र सराला बेट येथील श्री सदगुरू गंगागिरी महाराज गोदाधामचे मठाधिपती महंत ह.भ.प. रामगिरीजी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली.

स्नेहलता कोल्हे यांनी या सोहळ्यास भेट देऊन महंत रामगिरीजी महाराज यांचे पूजन करून त्यांच्या कीर्तनाचा लाभ घेतला. तत्पूर्वी, त्यांनी श्री खंडोबाचे मनोभावे दर्शन घेऊन सर्व जनतेला सुखी, आनंदी व निरोगी जीवन लाभू दे, सर्वांच्या जीवनातील दु:ख नष्ट होऊन आनंद मिळू दे तसेच जनतेच्या सेवेसाठी सतत ऊर्जा मिळू दे, अशी प्रार्थना केली.

स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, मार्गशीर्ष महिन्यात ‘शुद्ध षष्ठी’ ही तिथी ‘चंपाषष्ठी’ म्हणून साजरी केली जाते. चंपाषष्ठीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व असून, या दिवशी खंडेरायाची पूजा केली जाते. मार्गशीर्ष महिन्यात चंपाषष्ठी व्रत केले जाते. याला खंडोबाचे नवरात्र असेही म्हटले जाते. खंडोबाभक्त चंपाषष्ठीला मनोभावे खंडोबाची पूजा करतात.

चंपाषष्ठीच्या दिवशी भाविक कुलधर्म कुलाचाराचा विधी करतात. ‘येळकोट येळकोट जय मल्हार। सदानंदाचा येळकोट॥‘ अशा जयघोषात कांदे-वांगे, भरीत रोडग्याचा विशिष्ट नैवेद्य दाखवून भंडारा, खोबरे उधळून श्री खंडोबा महाराजांचे दर्शन घेत आराधना करतात. श्री खंडोबा महाराजांना महानैवेद्य दाखविण्यापूर्वी तळी भरतात. 

चंपाषष्ठीच्या पावन पर्वावर खोपडी येथील श्री खंडोबारायांचे दर्शन घेऊन व येथे श्री खंडोबा देवस्थानमध्ये आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास उपस्थित राहून मन प्रसन्न झाले. चंपाषष्ठीसारखे विविध सण, उत्सव आपण साजरे करतो. हा एक संस्कार आहे. विचार आहे. यातून अध्यात्मिक वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे चालत राहिला पाहिजे. महंत ह.भ.प. रामगिरीजी महाराज यांच्यासह सर्व संत-महंत कीर्तन व प्रवचनातून समाजाची, देशाची व धर्माची सेवा करत आहेत. हे पुण्याचे काम आहे. हा राष्ट्रधर्म आहे. हे धार्मिक कार्य यापुढेही अखंड सुरू राहिले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. 

यावेळी सरपंच विठाबाई वारकर, उपसरपंच गोविंद नवले, मोहन जाधव, रमेश नवले, जयराम वारकर,  अशोक नवले, संजय भवर, ज्ञानेश्वर पवार, चांगदेव नवले, सोमनाथ भवर, बाळासाहेब नवले, सोमनाथ रायते, जगन्नाथ नवले, अक्षय वारकर, किशोर पवार, प्रमोद सिनगर, देवराम मंचरे, अण्णासाहेब जाधव यांच्यासह असंख्य भाविक-भक्त, खोपडी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.